मुख्यमंत्रीपदी राहू की जाऊ? त्रिपुरा सीएम बिल्पव देव जनतेला विचारणार

रविवारी एका कार्यक्रमात आपल्या राज्यातील लोकांना भेटणार आहे. हा कार्यक्रम लोकांसाठी खुला असेल आणि याच कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदी राहावे की नाही, अशी विचारणा करणार असल्याचे ते म्हणाले. मी जावे की थांबावे हे जनतेवरच निर्भर असून लोकांची मते पक्षनेतृत्वाला कळविली जाईल

आगरतळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी ‘बिप्लव हटाओ, भाजपा बचाओ’ च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांना दु:खही झाले होते. सर्व असंतुष्टांची मते जाणून घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तथापि या घटनेमुळे दु:ख झाले असून मुख्यमंत्री पदावर राहावे की सोडून द्यावे, अशी विचारणा आता लोकांनाच करणार असल्याचे बिप्लव देव म्हणाले.

रविवारी भेटणार
बिप्लव देव म्हणाले की, १३ डिसेंबर रोजी रविवारी ते एका कार्यक्रमात आपल्या राज्यातील लोकांना भेटणार आहे. हा कार्यक्रम लोकांसाठी खुला असेल आणि याच कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदी राहावे की नाही, अशी विचारणा करणार असल्याचे ते म्हणाले. मी जावे की थांबावे हे जनतेवरच निर्भर असून लोकांची मते पक्षनेतृत्वाला कळविली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, माझी एकच चूक आहे की मी राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. माझ्याकडे फक्त पाच वर्षे आहेत, मी ३० वर्षे काम करणारा सरकारी अधिकारी नाही असेही ते म्हणाले.

युती करण्यात अपयश
उल्लेखनीय असे की, त्रिपुरा गेस्ट हाऊसभोवती भाजपाचे नवनियुक्त पर्यवेक्षक विनोद सरकार प्रदेश नेत्यांशी बोलत होते. त्यावेळी ‘बिप्लव हटाओ-भाजपा बचाओ’ च्या घोषणा देण्या आल्या होत्या. भाजपा-आयपीएफटी युतीचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्या आल्यानंतरच या घोषणा देण्यात आल्या असा अंदाज व्यक्त केला जात आहे.