Shubhendu Adhikari on the way to BJP; Got Z security

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुभेंदु अधिकारी हे आमदारपदाचाही राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यापूर्वी ते भाजपात जाणार असल्याची चर्चा केली जात होती परंतु आता मात्र याबाबत सकारात्मक संकेतही प्राप्त झाले आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बंडखोरीचे संकेत दिलेले तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते आमदार शुभेंदु अधिकारी यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘आयबी’चा गोपनीय अहवाल आणि धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने शुभेंदु यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुभेंदु अधिकारी हे आमदारपदाचाही राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यापूर्वी ते भाजपात जाणार असल्याची चर्चा केली जात होती परंतु आता मात्र याबाबत सकारात्मक संकेतही प्राप्त झाले आहेत.

शनिवारचा मुहूर्त

दुसरीकडे, भाजपा नेते मुकुल रॉय यांनीही अधिकारी काही दिवसातच भाजपात सहभागी होणार असल्याचे संकेत दिले. अधिकारी यांच्याबाबत निर्णय झाला असून दोन-चार दिवसात ते पक्षात येतील असे मुकूल रॉय म्हणाले. दरम्यान ममता बॅनर्जींनी अख्खा बंगाल पालथा घातली त्यांना विजय मिळविणे अशक्य आहे असा दावाही त्यांनी केला. उल्लेखनीय असे की १९ डिसेंबर रोजी गृहमंत्री अमित शाह मिदनापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातच शुभेंदू अधिकारी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

कार्यालयाला भगवा रंग

शुभेंदु अधिकारी यांनी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे त्यांच्या नावाने एक कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाला भगव्या रंगाने रंगवल्याचे सांगण्यात येते. या कार्यालयाला ‘शुभेंदु बाबू सहायता केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. शुभेंदु यांचे निकटवर्तीय कनिष्क पांडा यांना भगव्या कार्यालयाबाबत विचारले असता त्यांनी हा रंग त्याग आणि सेवेचे प्रतीक असल्याचे म्हटले. यामुळे शुभेंदु अधिकारी यांनी भाजपात जाण्याचे निश्चित केले असल्याची चर्चा सुरू आहे.

राजीव बॅनर्जीही देणार ‘दे धक्का’

दरम्यान, शुभेंदु अधिकारी यांच्यानंतर राजीव बॅनर्जी हे टीएमसीला धक्का देऊ शकतात अशी चर्चा आहे.

अधिकारींचा अध्याय बंद : तृणमूल

तृणमूलने असंतुष्ट नेते अधिकारी यांचा अध्याय बंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आता नेतृत्व त्यांना पक्षात घेण्याबाबत विचार करणार नाही, असे ते म्हणाले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांची मनधरणी वा त्यांच्या तक्रारींचे निवारण न करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारीसारख्या एक दोन नेत्यांनी पक्ष सोडल्याने पक्षावर कोणताही फरक पडत नाही असेही एका नेत्याने सांगितले.