Six died and seven injured as a bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district,

राजस्थान (Rajasthan) मधील जालोरमध्ये भयंकर अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस विजेच्या तारांमध्ये अडकून लागलेल्या आगीत सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

जालोर : राजस्थान (Rajasthan) मधील जालोरमध्ये भयंकर अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस विजेच्या तारांमध्ये अडकून लागलेल्या आगीत सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ही प्रवासी बस रस्ता चुकल्यानं एका गावात पोहचली. या गावात विजेच्या तारा लटकत असलेल्या पाहून बस ड्रायव्हरनं बस थांबवली. त्यानंतर बसमधील एक कर्मचारी टपावर गेला आणि त्यानं काठीच्या मदतीनं विजेच्या तारा वर उचलण्याचा प्रयत्न करु लागला. याचवेळी त्या काठीमधून करंट त्या कर्मचाऱ्याच्या शरिरात आला. त्यामुळे तो कर्मचारी जागेवरच पेटला आणि त्याचबरोबर बसने पेट घेतला.

या अपघातामधील मृतदेहांना बसच्या बाहेर काढण्यात आलं आहे. मृतांमध्ये बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. या अपघातामधील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातामधील सर्व जखमींना जोधपूरच्या (Jodhpur) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.