भरधाव ट्रक घुसला मिठाईच्या दुकानात, चिरडले गेले १६ जण, होळीदिवशी रंगाचा बेरंग

बिहारच्या नालंदातील एका मिठाईच्या दुकानात ट्रक घुसला आणि त्यानं तब्बल १६ जणांना चिरडलं. यातील ६ जणांचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मिठाईच्या दुकानात घुसला आणि तिथं असणाऱ्या नागरिकांना काही कळायच्या आतच ते ट्रकखाली सापडले. या घटनेनंतर परिसरात कमालीचा तणाव वाढला. तिथले ग्रामस्थ या घटनेनं संतप्त झाले आणि घटनेचा तपास करायला आलेल्या पोलिसांना त्यांनी लक्ष्य केलं. 

    देशभरात होळी सण साजरा होत असताना बिहारच्या नालंदामध्ये एका भीषण अपघातामुळं शोककळा पसरलीय. बिहारच्या नालंदामध्ये एक ट्रक थेट मिठाईच्या दुकानात घुसला. ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक गर्दी असलेल्या बाजारपेठेतील एका मिठाईच्या दुकानात घुसल्याने मृत्यूचं अक्षरशः तांडव घडलं.

    बिहारच्या नालंदातील एका मिठाईच्या दुकानात ट्रक घुसला आणि त्यानं तब्बल १६ जणांना चिरडलं. यातील ६ जणांचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मिठाईच्या दुकानात घुसला आणि तिथं असणाऱ्या नागरिकांना काही कळायच्या आतच ते ट्रकखाली सापडले. या घटनेनंतर परिसरात कमालीचा तणाव वाढला. तिथले ग्रामस्थ या घटनेनं संतप्त झाले आणि घटनेचा तपास करायला आलेल्या पोलिसांना त्यांनी लक्ष्य केलं.

    या घटनेनंतर जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरही नागरिकांनी दगडफेक केली आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात जाळपोळ केली. हजारोंच्या संख्येनं जमलेल्या लोकांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. हा गोंधळ सुरू असतानाच काही लोकांनी पोलिसांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढून रुग्णालयाकडे रवाना केलं. गर्दीतील काही ग्रामस्थांनी एका पोलिसाची सर्व्हिस रिवॉल्व्हरदेखील लांबवली. त्यानंतर इतर नागरिकांनी त्याची समजूत काढून ही रिवॉल्व्हर पोलिसांना परत करण्यात आली.

    ही दुर्घटना नालंदा जिल्ह्यातील तेल्हाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या ताडपर या गावात घडली. या घटनेनंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.जखमींवर सध्या उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत.