…म्हणून जोडप्याने दारूच्या दुकानासमोरच लग्न केले 

केरळातील एका भागात रस्त्यावर एक लग्न पाहायला मिळाले. चक्क दारूच्या दुकानासमोर उभे राहून आणि गर्दीच्या वेळी या अनोख्या लग्नावरच येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा खिळलेल्या होत्या. दारू खरेदीसाठी जे लोक येत होते तेही या जोडप्याकडे वळून वळून बघत होते. या जोडप्याने केलेले हे लग्न खरे नसून ते प्रतिकात्मक होते. आपला निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी हे लग्न केले होते.

    तिरुवनंतपूरम : केरळातील एका भागात रस्त्यावर एक लग्न पाहायला मिळाले. चक्क दारूच्या दुकानासमोर उभे राहून आणि गर्दीच्या वेळी या अनोख्या लग्नावरच येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा खिळलेल्या होत्या. दारू खरेदीसाठी जे लोक येत होते तेही या जोडप्याकडे वळून वळून बघत होते. या जोडप्याने केलेले हे लग्न खरे नसून ते प्रतिकात्मक होते. आपला निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी हे लग्न केले होते.

    कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक निर्बंध लावलेले आहेत. लग्नातही 50 पेक्षा अधिक लोकांना सहभागी होण्याची परवानगी नाही. अशा प्रकारच्या लग्नांमुळे संबंधित व्यवसाय ठप्प झाले आहेत. यासाठीच केरळ मधल्या केटरिंग व्यावसायिकांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी दारूच्या दुकानाबाहेर प्रतिकात्मक लग्न लावले. कोझिकोडे भागाचे खासदार एमके राघवन यांनी आपले भाषण संपवताच एक जोडपे नवरा-नवरीप्रमाणे नटून आले आणि त्यांनी एकमेकांना हार घालत प्रतिकात्मक लग्न केले.

    नवरा मुलगा प्रमोद आणि नवरीमुलगी धान्या हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून केटरिंग व्यवसायात आहेत. अशा प्रकारची लग्न फक्त याच भागात नाही तर राज्याच्या इतरही भागात लावण्यात आली असल्याचा दावा या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, दारूची दुकाने तसेच इतरही अनेक प्रकारची दुकाने उघडली जात आहेत.

    दारूच्या दुकानाबाहेर जी गर्दी होते, त्यावर सरकारला आक्षेप नाही. मात्र लग्नामध्ये 50 पेक्षा जास्त लोक आले तर मात्र सरकारला त्याबद्दल आक्षेप आहे. सरकारने किमान 100 जणांना लग्नामध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी. केटरिंग व्यावसायिकांच्या या संघटनेने सांगितले की, या व्यवसायाशी साधारण दोन लाखांहूनही अधिक लोक संबंधित आहेत. लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. सरकारकडून मात्र कोणतीही मदत मिळत नसल्याची खंत या संघटनेने व्यक्त केली आहे.