नात्याला काळिमा फासणारी घटना, गर्लफ्रेंडशी बोलण्यापासून रोखलं म्हणून मुलाने पित्याला…..

एका पित्याने मुलाला फक्त गर्लफ्रेंडशी फोनवर बोलण्यास रोखलं म्हणून नराधम मुलाने आपल्याच वडिलांची हत्या(Son Murdered His Father) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) औरैया येथे बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पित्याने मुलाला फक्त गर्लफ्रेंडशी फोनवर बोलण्यास रोखलं म्हणून नराधम मुलाने आपल्याच वडिलांची हत्या(Son Murdered His Father) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  वडिलांच्या हत्येनंतर आरोपी मुलगा हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    ही घटना औरैया येथील भीखेपूर येथे घडली आहे. या गावात अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांना दहा मुलं आणि एक मुलगी होती. यापैकी मोठी मुलगी आणि मुलाचं लग्न झालं होतं. त्यांच्या पाचव्या नंबरचा मुलगा शिवम याचं एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण त्याला अरविंद यांचा विरोध होता. शिवम हा घरातही त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मोबाईलवर बोलायचा.त्यावरून बाप-लेकामध्ये वाद व्हायचा. शिवमने त्या मुलीशी फोनवर बोलू नये, अशी त्याच्या वडिलांची म्हणजेच अरविंद यांची इच्छा होती. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये सारखा वाद व्हायचा, अशी माहिती घरातील इतर सदस्यांनी दिली.

    अरविंद यांचा मुलगा प्रदीप याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि शिवम यांच्यात सोमवारी प्रेमसंबंधांवरुन कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर शिवम घर सोडून निघून गेला. तो रात्री उशिरा घरी आला. पण त्याच्या मनात वडिलांप्रती प्रचंड राग होता. त्यामुळे तो घरी येताना एका मंदिरातून त्रिशूल सोबत घेऊन आला होता. तो घरी आला तेव्हा त्याचे वडील अरविंद हे झोपले होते. शिवम याने थेट आपल्या पित्याच्या पोटात त्रिशूल खुपसला. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

    वडिलांचा जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातील इतरांना जाग आली. त्यांनी तातडीने अरविंद यांच्याकडे धाव घेतली. यावेळी घरातल्यांनी जे बघितलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. अरविंद रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात नेलं गेलं. पण तोपर्यंत त्यांच्या शरीरातील बरंच रक्त वाहून गेलं होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

    पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अरविंद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिवम याचा शोध सुरु केला आहे.