दोन दिवसांपूर्वी हातावर रचली मेहंदी; लग्नाच्या दिवशीच घरातून निघाली प्रेतयात्रा

    रांची (Ranchi).  हातावर मेहंदी लावलेली होती अन् शुक्रवारी लग्न (Marriage) होणार होतं. मात्र, गुरुवारीच लग्नाचं हे प्रसन्न वातावरण भयंकर दुःखात बदललं. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच 23 वर्षीय पुनम कुमारी नावाच्या तरुणीला बुधवारी रात्री उशिरा साप चावला. ‘या’ घटनेत तिचा दुर्देवी मृत्यू (Bride Died Due to Snake Bite) झाला. सत्येंद्र प्रसाद यांच्या या तेवीस वर्षीय मुलीचं शुक्रवारी लग्न होणार होतं. मात्र, त्याआधीच ही दुर्देवी घटना घडली. ही घटना झारखंडच्या (Jharkhand) धनबादमधील बरवाअड्डा ठाण्याच्या क्षेत्रातील कुलबेडा गावातील आहे.

    या घटनेबाबत स्थानिक लोकांनी सांगितलं, की पुनमचं लग्न 16 जुलै कोलकात्यात ठरलं होतं. सर्व नातेवाईक लग्नाच्या तयारीला लागले होते. बुधवारी रात्री उशिरा हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुनम आपल्या रुममध्ये झोपण्यासाठी गेली. मात्र, झोपेतच तिला साप चावला. पुनमचा ओरडण्याचा आवाज ऐकून नातेवाईक तिच्या रुममध्ये आले. यानंतर तिनं सांगितलं की मला साप चावला आहे. घटनेनंतर घरात एकच गोंधळ उडाला.

    कुटुंबीयांनी पुनमला उपचारासाठी एसएनएमएमसीएच धनाबादमध्ये दाखल केलं. मात्र, काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पुनमचे वडील बिहारच्या नवादा जिल्ह्यातील कोलडीहा येथील रहिवासी आहेत. मात्र, मागील दहा वर्षांपासून ते बरवाअड्डा ठाण्याच्या क्षेत्रातील कुलबेजा गावात राहात होते. पुनम धनबादच्या बीएसएस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.