संघाने कारवाईचा बडगा उगारला; ट्रस्टमधून अनेकांची गच्छंती होणार

संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी ट्रस्टबाबत नवी रणनीती बनविण्याच्या कामाला लागले आहेत. ते लवकरच अयोध्येत जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. चित्रकूटमध्ये सुरू असलेल्या संघाच्या बैठकीत श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना बोलाविण्यात आले आहे. राय यांना ट्रस्टच्या कामापासून दूर केले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    चित्रकूट : अयोध्येत राम मंदिरासाठी सुरू असलेल्या भूखंड खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारने राम मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन केले, मात्र याच ट्रस्टवर आता भूखंड घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ट्रस्टवर प्रचंड नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. घोटाळ्याप्ररणी संघाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

    संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी ट्रस्टबाबत नवी रणनीती बनविण्याच्या कामाला लागले आहेत. ते लवकरच अयोध्येत जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. चित्रकूटमध्ये सुरू असलेल्या संघाच्या बैठकीत श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना बोलाविण्यात आले आहे. राय यांना ट्रस्टच्या कामापासून दूर केले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    चंपत राय विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्षदेखील आहेत. यामुळे ते ट्रस्टला मदत करीत राहतील. याचबरोबर, ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर संघाशी संबंधित एकाद्या संघटनेची जबाबदारी सोपवून त्यांनादेखील ट्रस्टच्या कामापासून दूर केले जाऊ शकते. ट्रस्टच्या ज्या पदाधिकाऱ्यांचे नाव या प्रकरणात समोर आले आहे, त्यांची गच्छंती करून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न संघाकडून केले जात आहे.

    नव्या भूखंड व्यवहारांवर बंदी

    सध्या ट्रस्टने नवीन जमीन खरेदीवर बंदी घातली आहे. बिजई परिसरातील जमीन खरेदी व्यवहारावरून ट्रस्टवर घोटाळ्याचे आरोप केले जात आहे. येथील 2 कोटी रुपये किंमत असलेल्या भूखंडासाठी ट्रस्टने 18 कोटी रुपये मोजले होते. त्याच कोळसा डेपो परिसरातील मोठ्या भूखंडाची खरेदी केली जाणार होती. मात्र, त्यावर बंदी आणण्यात आली आहे.

    भय्याजी जोशींची घातले लक्ष

    जमीन घोटाळ्याबाबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संघाकडून वरवर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचा बचाव केला जात असला तरी अंतर्गत नाराजीचे सूर उठू लागले आहे. भूखंड खरेदी घोटाळ्याचे आरोप होताच संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी याप्रकरणात लक्ष घातले आहे. ते लवकरच अयोध्येत जातील. या प्रकरणात ज्यांची नावे समोर आली आहेत, ते ट्रस्टचे पदाधिकारी कायदेशीररीत्या ट्रस्टमध्ये राहतील, परंतु त्यांचा ट्रस्टमधील प्रभाव संपवून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न संघाकडून केले जातील.