मुलांनी पित्याचा मृतदेह सायकलवरुन नेला स्मशानभूमीत

बेळगावमधील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावात ७० वर्षीय व्यक्तीचे निधन झाले होते. परंतु गावकाऱ्यांनी अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. त्यामुळे मुलांनी इतर वाहन किंवा शववाहिका मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कोणतेच वाहन सापडले नाही. अखेर त्यांनी सायकलवर मृतदेह बांधला आणि अंत्यसंस्कारास नेला.

बेळगाव : कोरोनामुळे देशातील जनतेत भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक एकमेकांना सहकार्य करण्यास घाबरत आहेत. बेळगाव जिल्ह्यात माणुसकी हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनामुळे लोक कोणाच्या अंत्यसंस्कारासही जात नाही आहेत. बेळगाव जिल्ह्यात वृद्धाच्या अंत्यसंस्कारास नातेवाईक आणि शेजारीही न आल्याने मुलांना मृतदेह सायकलवर बांधून स्मशानात न्यायला लागला आहे. अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 

बेळगावमधील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावात ७० वर्षीय व्यक्तीचे निधन झाले होते. परंतु गावकाऱ्यांनी अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. त्यामुळे मुलांनी इतर वाहन किंवा शववाहिका मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कोणतेच वाहन सापडले नाही. अखेर त्यांनी सायकलवर मृतदेह बांधला आणि अंत्यसंस्कारास नेला. 

या व्यक्तीची प्रकृती १५ ऑगस्टला अचानक खालावली, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली होती. परंतु ती ही वेळेवर उपलब्ध झाली नाही. उपचाराअभावी रुग्णाचा राहत्या घरीच मृत्यू झाला. मुलांनी गावकाऱ्यांना कळविले परंतु कोरोनाच्या भितीने तसेच अफवेमुळे कोणीही पुढे आले नाही. अगदी नातेवाईकांनीही अंत्यसंस्काराला येण्यास टाळले. त्यामुळे मुलांनी बापाचा मृतदेह सायकलवर स्मशानभूमित नेला. गावातील लोक त्यांना नेताना बघत होते. परंतु कोणीही पुढाकार घेतला नाही.