दारुड्यानं पळवला कोंबडा! म्हणाला, कापून खाल्ला आता काय करू?; पोलिसांनी दिलं ‘हे’ उत्तर

दारुच्या नशेत चिकन शॉपमधून कोंबडा चोरणाऱ्या दारुड्याला पोलिसांनी चार तासाच्या आत शोधून काढलं आणि चोरीचा उलगडा केला. दारुच्या नशेत कोंबडा चोरून नेलेल्या या इसमानं तो कापून, शिजवून खाऊनही फस्त केला होता.

    इंदूर : दारुच्या नशेत चिकन शॉपमधून कोंबडा चोरणाऱ्या दारुड्याला पोलिसांनी चार तासाच्या आत शोधून काढलं आणि चोरीचा उलगडा केला. दारुच्या नशेत कोंबडा चोरून नेलेल्या या इसमानं तो कापून, शिजवून खाऊनही फस्त केला होता. पोलीस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने सरळ हात वर केले. आता आपण कोंबडा कापून खाऊन टाकला आहे, आता काय करू, असा प्रतिसवाल त्याने पोलिसांना केला.

    नेमकं चोरी कशी झाली?

    मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आकाश नावाचा तरुण जिवंत कोंबड्या आणि चिकन विकण्याचं दुकान चालवतो. एक दिवस आकाश टॉयलेटसाठी दुकान सोडून गेला होता. तो परत आल्यावर दुकानातून एक कोंबडा चोरीला गेल्याचं त्याला दिसलं. पण हा कोंबडा नेमका कुणी चोरला, याची कुठलीही कल्पना आकाशला आली नाही. त्याने सरळ पोलिसांना फोन करून या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. असा केला तपास पोलिसांनी आजूबाजूच्या काही दुकानदारांकडे चौकशी केली असता, आकाशचा शंकर नावाचा मित्र दारुच्या नशेत त्याच्या दुकानात आला असल्याची माहिती त्यांना समजली. पोलिसांनी ही बाब आकाशच्या कानावर घातली.

    त्यावर शंकर हा दारुडा असून तो कोंबडा चोरून नेण्याची दाट शक्यता असल्याचं आकाशनं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आकाशकडून शंकरचा पत्ता घेतला. शंकरच्या घरी पोलीस पोलिसांनी तातडीनं शंकरचं घर गाठलं. तोपर्यंत शंकरनं कोंबडा कापून त्याचं चिकन खाऊन फस्त केलं होतं. पोलिसांना पाहताच त्याची तारांबळ उडाली. तोपर्यंत त्याची दारुदेखील उतरली होती. आपण दारुच्या नशेत कोंबडा चोरल्याचं त्यानं मान्य केलं. मात्र आता तो कोंबडा आपण खाल्ला असल्याचं सांगत आता काय करु, असा सवाल पोलिसांना विचारला.

    पोलिसांनी शंकरला आकाशच्या दुकानापाशी नेलं. तिथं दोघांची भांडणं झाली. पोलिसांनी ही भांडण सोडवत शंकरने आकाशला कोंबडीची किंमत म्हणून 150 रुपये द्यावेत, असं सुचवलं. दोघांनीही ही बाब मान्य केली. शंकरने आकाशला 150 रुपये दिले आणि वाद मिटला.