केरळमध्ये पहिले डिजिटल विद्यापीठ; शिक्षण क्षेत्रातील मोठे पाऊल

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, देशातील हे अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ आहे व या माध्यमातून तरुणांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. जगभरात तंत्रज्ञानाच्या आधारावर बदल होत आहेत. आपल्याला यासाठी प्रतिभावंत लोकांना प्रोत्साहन देणे व तंत्रज्ञानाच्या रूपात सक्षम बनविण्याची आवश्यकता आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचे लाभ लोकांसाठी उपलब्ध केले जातील.

    तिरुवनंतपूरम : केरळ राज्याने शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत तिरुवनंतपूरमजवळील मंगलापूरम येथील टेक्नोसिटीत देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ सुरू केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या विद्यापीठाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री विजयन व केरळ युनिव्हर्सिटी ऑफ डिजिटल सायन्सेस, इनोव्हेश अॅण्ड टेक्नॉलॉजीचे कुलपती राज्यपाल खान यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित केले.

    नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन

    उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत राज्यपाल खान यांनी सांगितले की, डिजिटल विद्यापीठाची सुरुवात नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे व त्याद्वारे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याच्या राज्य सरकारच्या संकल्पाचा भाग आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, हे विद्यापीठ उच्च शिक्षण व तंत्रज्ञानाचा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावेल. राज्यपालांनी सांगितले की, आपल्या जीवनात ज्ञानाची मोठी भूमिका आहे. यामुळे आपल्यात साहस, समजुतदारपणा, एकता यांची समज येते. तसेच यामुळे अज्ञानापासून सुटका होते. या डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, डाटा अॅनालिटिक्ससहित अन्य डिजिटल अभ्यासक्रम शिकविण्यात येतील. यामुळे ते या क्षेत्रात प्रगती करू शकतील.

    तरुणांना मिळणार संधी : मुख्यमंत्री

    मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, देशातील हे अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ आहे व या माध्यमातून तरुणांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. जगभरात तंत्रज्ञानाच्या आधारावर बदल होत आहेत. आपल्याला यासाठी प्रतिभावंत लोकांना प्रोत्साहन देणे व तंत्रज्ञानाच्या रूपात सक्षम बनविण्याची आवश्यकता आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचे लाभ लोकांसाठी उपलब्ध केले जातील.

    ‘स्कूल ऑफ नॉलेज’

    या डिजिटल विद्यापीठाची स्थापना दोन दशके जुनी संस्था भारतीय माहिती तंत्रज्ञान व प्रबंधन केरळला अपग्रेड करून केली आहे. विद्यापीठाने यासाठी ५ स्कूल ऑफ नॉलेज बनविले आहे. यात स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंग, स्कूल ऑफ डिजिटल सायन्सेस, स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स अॅण्ड ऑटोमेशन, स्कूल ऑफ इन्फ्रामेटिक्स व स्कूल ऑफ डिजिटल ह्युमॅनिटीज अॅण्ड लिबरल आर्ट्सचा समावेश आहे.