The government is exploiting like the British; Priyanka Gandhi's attack on Modi

रविवारी दुपारी सरधना विधानसभा मतदारसंघातील कैली गावात आयोजित महापंचायतीला त्या संबोधित करीत होत्या. यावेळी त्यांनी जनतेला काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आशीर्वादही मागितला. या महापंचायतीत प्रियांका गांधी ट्रॅक्टरवर स्वार होऊन दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मेरठमधील स्वातंत्र्य संग्रामाचीही आठवण ताजी केली.

  दिल्ली : शेतकरी आणि सरकारमध्ये तीनही कृषी कायद्यांवरून तिढा कायम असतानाच काँग्रेस सरचिटणीस आणि राज्याच्या प्रभारी प्रियांका गांधी वढेरा यांनी आज चवथ्यांदा पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी महापंचायतीत भाग घेऊन मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढविला. मोदी सरकार इंग्रजांप्रमाणेच शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  रविवारी दुपारी सरधना विधानसभा मतदारसंघातील कैली गावात आयोजित महापंचायतीला त्या संबोधित करीत होत्या. यावेळी त्यांनी जनतेला काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आशीर्वादही मागितला. या महापंचायतीत प्रियांका गांधी ट्रॅक्टरवर स्वार होऊन दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मेरठमधील स्वातंत्र्य संग्रामाचीही आठवण ताजी केली.

  कायदे तयार करण्यापूर्वी कोणालाच विचारणाही करण्यात आली नाही अशी टीकाही त्यांनी मोदी सरकारवर केली. कायदे जर तुमच्यासाठीच तयार केले असतील तर शेतकरी दिल्लीच्या सीमांवर का बसले आहेत असा सवालही त्यांनी केला. शेतकरी जर सीमेवर आंदोलन करीत असले तर त्याचा पंतप्रधानांनी सन्मान करायला हवा परंतु त्याऐवजी त्यांनी पाणी, वीज कापले असा घणाघातही त्यांनी केला.

  मोदी सरकार मोठमोठ्या उद्योगपतींसाठीच आहे. त्यांचे तर केवळ दोनच मित्र आहेत अशी टीकाही त्यांनी केली. वीजेचे दर, पेट्रोल-डिझेलचे दरही वाढविले. चोहोबाजूंनी जनतेवरच वार करीत आहत. ही स्थिती बदलण्यासाठी आता उभे राहावे लागेल असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. जी स्थिती सरकारने उभी केली आहे ती बदलविण्यासाठी आता परिवर्तन आणावेच लागेल असेही प्रियांका म्हणाल्या.

  उत्तर प्रदेशचे 10 हजार कोटी रुपये केंद्राकडे थकित आहेत ते तर मोदी सरकारने दिले नाहीत परंतु दोन विमाने मात्र 16 हजार कोटीत खरेदी केली अशी टीकाही त्यांनी केली. संपूर्ण देशाची थकित रक्कमच 15 कोटी आहे असेही त्या म्हणाल्या.

  मेरठमधूनच स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत हजारो शेतकरीही सहभागी झाले होते. अनेक जण शहीदही झाले. इंग्रजांचे साम्राज्य शेतकऱ्यांना त्रस्त करीत होते. भाजपाचे सरकारही शेतकऱ्यांचे शोषणच करीत आहे. कायदेही असे कठोर आहेत ज्याद्वारे तुम्हाला उत्पन्नही पुरेसे होणार नाही. कृषी कायदे तर उद्योगपतींच्या फायद्यासाठीच आहेत. याचा तुम्हाला काय लाभ?

  - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस