yaas cyclone

पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर पुढील चोवीस तासात आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. ज्या ठिकाणी हे चक्रीवादळ येऊ शकते त्या ठिकाणी सुरक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह अंदमान निकोबार बेटचे उपराज्यपाल यांच्यासमवेत बैठक घेतली आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही सोमवारी बैठकीच्या माध्यमातून तयारीचा आढावा घेतला.

  दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर पुढील चोवीस तासात आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. ज्या ठिकाणी हे चक्रीवादळ येऊ शकते त्या ठिकाणी सुरक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह अंदमान निकोबार बेटचे उपराज्यपाल यांच्यासमवेत बैठक घेतली आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही सोमवारी बैठकीच्या माध्यमातून तयारीचा आढावा घेतला.

  24 तासात बंगालला धडकणार

  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची संकेत हवामान खात्याने दिले आहेत. 25 मे पर्यंत चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होणार आहे. म्हणजेच येथे वाऱ्याचा वेग ताशी 118-165 किमी असण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ बंगालाला धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्ण वातावरण राहणार असून महाबळेश्वरसह काही थंड हेवेच्या ठिकाणी वातावरण जैसे थे असेल असे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत.

  सुरक्षा कर्मचारी, एनडीआरएफ तैनात

  चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाची पूर्व किनारपट्टी सज्ज झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचे केंद्र सध्या पोर्ट ब्लेअरपासून 600 किलोमीटर दूर आहे. येत्या 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. 26 मे रोजी हे चक्रीवादळ वादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने आपल्या सुमारे 950 जवानांना देशातील विविध ठिकाणांहून एअरलिफ्ट करून, बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात तैनात केले आहे. याठिकाणी 26 हेलिकॉप्टरही स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत. सुमारे 800 हून अधिक ओडीआरएएफ कर्मचारी टॉवर लाईट, सर्च लाईट, जेनसेट्स, जेसीबी, हायड्रा क्रेन्स, इन्फ्लेटेबल बोट्स, हायड्रॉलिक ट्री कटर्स, गॅस कटर्स, प्लाज्मा कटर्स, सॅटेलाईट फोन्स आणि वॉकीटॉकी अशा साहित्यासह येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती लष्कराने दिली.

  रेल्वेकडून आणखी 25 गाड्या रद्द

  लवकरच पूर्व भारताला धडक देण्याच्या तयारीत असलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाकडून काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व रेल्वेने 24 मे ते 29 मे दरम्यान चालणाऱ्या 25 रेल्वेगाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियाद्वारे रेल्वे प्रशासनाने ही घोषणा केली आहे. यामध्ये बिहारच्याही काही गाड्यांचा समावेश आहे.