अयोध्येतील राम मंदिर लवकरच दर्शनासाठी खुले होणार ; जाणून घ्या कधी

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनिअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

    अयोध्या: देशातील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन मिळण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मिळणार आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात २०२३ अखेरपर्यंत दर्शन करता येणार आहे. तोपर्यंत गर्भगृहात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापन करण्यात येतील. अर्थात, या मंदिराचे बांधकाम २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे.

    श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनिअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, २०२३ च्या अखेरपर्यंत मंदिरात दर्शन करता येईल. ७० एकर परिसरात मंदिर असणार आहे. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते. मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामाला गती येणार आहे.

    आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वीच दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या माध्यमातून भाजप दिलेला शब्द पूर्ण करणार आहे.