आरोपी दिलीप देवलचे रतलाम पोलिसांकडून एनकाउंटर
आरोपी दिलीप देवलचे रतलाम पोलिसांकडून एनकाउंटर

उत्तर प्रदेश, तेलंगणा पाठोपाठ आता मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी शहरातील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी दिलीप देवलचे एनकाउंटर केले आहे. गुरुवारी रात्री शेतामध्ये झालेल्या एनकाउंटरमध्ये दिलीप जागीच ठार झाला. यावेळी झालेल्या चकमकीत ५ पोलीस जखमी झाले आहेत.

  • गुंडाच्या गोळीबाराला पोलिसांचे ‘जशास तसे उत्तर’

भोपाळ (Bhopal).  उत्तर प्रदेश, तेलंगणा पाठोपाठ आता मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी शहरातील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी दिलीप देवलचे एनकाउंटर केले आहे. गुरुवारी रात्री शेतामध्ये झालेल्या एनकाउंटरमध्ये दिलीप जागीच ठार झाला. यावेळी झालेल्या चकमकीत ५ पोलीस जखमी झाले आहेत.

आरोपीने आत्मसमर्पण करावे; पोलिसांनी केले होते आवाहन !
या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीपने आत्मसमर्पण करावं असं आवाहन पोलिसांनी केले होते. त्यावेळी त्याने ते आवाहन धुडकावून लावत पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात आरोपी दिलीप ठार झाला. यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यामध्ये दोन सब इन्सपेक्टरचा समावेश आहे. सर्व जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिलीप होता अट्टल गुन्हेगार!
रतलाममधील तिहेरी हत्याकांडापूर्वी देखील गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दिलीपवर गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरामधील दाहोदमध्ये 2017 साली झालेली दोन हत्या प्रकरणं आणि 2009 मधील रतलाम बलात्कार प्रकरणातही दिलीप आरोपी होता.

दिलीपने गुजरातमधील दोन व्यापाऱ्यांच्या नावाने बनावट ओळखपत्रंही तयार केली होती. त्याचबरोबर दाहोदमधील एका व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणात त्याला आजन्म जन्मठेप झाली होती. दिलीपला या प्रकरणी २०१९ साली पॅरोल मिळाला होता. पॅरोलवर बाहेर आल्यानंतरही दिलीपच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. अखेर रतलाम पोलिसांनी त्याचा एनकाउंटरमध्ये खात्मा केला आहे.

तिहेरी हत्याकांडाचा आरोपी
रतलाममध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा दिलीप मुख्य आरोपी होता. गुजरातमधील दाहोद जिल्ह्याचा रहिवाशी असलेला दिलीपने तीन साथीदारांच्या मदतीने रतलाममधील एका सलून चालक परिवाराच्या घरात पहिल्यांदा चोरी केली. त्यानंतर या चोरीचा कोणताही पुरावा शिल्लक राहू नये यासाठी त्याने घरातील तीन्ही व्यक्तींना ठार मारले. ऐन देव दिवाळीच्या रात्री झालेल्या या हत्याकांडाने रतलामसह संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती.