jp nadda and kailash vijaywargiy

बंगालमध्ये प्रचारासाठी दाखल झालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. बंगालमध्ये काश्मिरपेक्षाही स्थिती चिंताजनक असल्याचा दावा करीत राज्यात लवकरात लवकर आचारसंहिता लागू करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना आता पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असतानाच राज्यातील राजकीय वातावरण मात्र तप्त झाले आहे. बंगालमध्ये प्रचारासाठी दाखल झालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. बंगालमध्ये काश्मिरपेक्षाही स्थिती चिंताजनक असल्याचा दावा करीत राज्यात लवकरात लवकर आचारसंहिता लागू करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली.

कायदा सुव्यवस्था स्थिती हाताबाहेर

भाजपा शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी केले. या शिष्टमंडळात पश्चिम बंगाल भाजपा सचिव सब्यसाची दत्ता आणि भाजपा निवडणूक समितीचे संयोजक शिशिर बाजोरिया यांचाही समावेश होता. तिनही नेत्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर चिंता व्यक्त करीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांना दोन पानांचे निवेदनही सादर केले. या निवेदनात नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे तसेच राज्यातील पोलिस तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणे काम करीत आहे, असा आरोपही केला.

निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी

पश्चिम बंगालच्या सुरक्षेसाठी राज्यात निमलष्करी दल तैनात करण्यात यावे अशी मागणीही भाजपा शिष्टमंडळाने केली. सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे तृणमूलला पाठिंबा दिला जात असल्यानेच राज्यात निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेणे अशक्य असल्याचा दावाही या शिष्टमंडळातील नेत्यांनी केला.

उपायुक्तांचा उद्या बंगाल दौरा

भाजपा शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतली आहे. उद्या गुरुवार १७ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन बंगाल दौऱ्यावर जाणार असून ते स्थितीचा आढावा घेणार आहेत.