नवस पूर्ण करण्यासाठी महिलेने कापली जीभ

बराच वेळ तिचे कुटुंबीय तिला मंदिरातून घेऊन गेले नाहीत. तिला तिथेच मंदिराच्या प्रांगणात झोपविण्यात आले आणि तिथे बसून भजन करू लागले. दुपारी बारा वाजता तिने जीभ कापली होती. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत तिला शुद्ध आली नव्हती.

    भोपाळ (Bhopal) : सध्या नवरात्र सुरू असल्याने देवीची आराधना करण्यात येत आहे. मध्यप्रदेशात मात्र एका महिलेने देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी स्वतःची जीभ कापून घेतली आहे. मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातल्या रायगड येथे ही महिला राहते. तिचे नाव रामा बन्सल असे आहे. तिने नवरात्रीनिमित्त घरी घट बसविले होते. देवीला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी रामाने स्वतःची जीभ कापली. जीभ कापल्यानंतर ती बेशुद्ध पडली. तिला तिचे कुटुंबीय सतना जिल्ह्यातील मेहर येथे असलेल्या मां शारदा या शक्तिपीठावर घेऊन आले.

    येथील मंदिर समिती आणि पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला; मात्र बराच वेळ तिचे कुटुंबीय तिला मंदिरातून घेऊन गेले नाहीत. तिला तिथेच मंदिराच्या प्रांगणात झोपविण्यात आले आणि तिथे बसून भजन करू लागले. दुपारी बारा वाजता तिने जीभ कापली होती. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत तिला शुद्ध आली नव्हती. स्थानिक प्रशासनानेही तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला तरीही कुटुंबीयांनी त्याला नकार दिल्याची माहिती मिळत आहे. सध्या महिलेची प्रकृती गंभीर नसली तरीही तिला उपचारांची गरज असल्याचे तिला तपासणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.