…तर मत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा; भाजपच्या मित्रपक्षाची टीका

कोरोनाची लस घेतल्यानंतर देणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. याबद्दल विरोधकांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील मोदींचा फोटो असायला हवा, असे ट्विट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केले आहे.

    पाटणा : कोरोनाची लस घेतल्यानंतर देणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. याबद्दल विरोधकांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील मोदींचा फोटो असायला हवा, असे ट्विट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केले आहे.

    मुख्यमंत्र्यांचाही फोटो असावा

    लसीच्या प्रमाणपत्रांवर फोटो छापण्याची इतकी हौस असेल तर कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील फोटो छापला जावा. तेच न्यायाला धरून असेल, असे मांझी यांनी ट्विटमध्ये म्हटले. मांझी यांनी नुकतीच लस घेतली. यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रात मोदी यांच्या छायाचित्रावरून त्यांनी आक्षेप घेतला. केवळ पंतप्रधानांचेच छायाचित्र का असा सवाल करून प्रमाणपत्रावर कायद्याने त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र प्रमाणपत्रावर असायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. म्हणजेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे छायाचित्र प्रसिद्ध करायला हवे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, हे ट्विट त्यांनी थोड्या वेळातच डिलिटही केले.

    ते म्हणाले की, घटनात्मकदृष्ट्या प्रमुख या नात्याने प्रमाणपत्रावर राष्ट्रपतींचे छायाचित्र असायला हवे होते. पण तसे न करता पंतप्रधानांचे छायाचित्र छापले जात असेल तर मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र त्यावर असायला हवे. मांझी यांच्या मागणीला भाजपने विरोध केला आहे. पक्षाचे बिहारमधील उपाध्यक्ष राजीव रंजन म्हणाले की, लसीकरणाबद्दल संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे. पण मांझी मात्र छायाचित्रावरून राजकारण करीत आहेत.