This is how money donated to the temple is used; ... so the faith of Muslims is also on this temple

राजस्थानमधील श्योपूर जिल्ह्यातील पांडोली गाव शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. येथील गुंसाईजी महाराज मंदिर समांतर बँकेप्रमाणे काम करत आहे. इथे शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्ज दिले जाते मात्र, व्याज आकारणी होत नाही. त्याबदल्यात कोणतीही हमी देण्याची किंवा कागदपत्रांची गरज लागत नाही. आसपासच्या 50 गावांतील शेतकरी कर्ज घेण्यासाठी इथे येतात.

  जयपूर : राजस्थानमधील श्योपूर जिल्ह्यातील पांडोली गाव शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. येथील गुंसाईजी महाराज मंदिर समांतर बँकेप्रमाणे काम करत आहे. इथे शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्ज दिले जाते मात्र, व्याज आकारणी होत नाही. त्याबदल्यात कोणतीही हमी देण्याची किंवा कागदपत्रांची गरज लागत नाही. आसपासच्या 50 गावांतील शेतकरी कर्ज घेण्यासाठी इथे येतात.

  असे मिळते कर्ज

  विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून एकाही शेतकऱ्याने कर्ज थकीत केले नाही. त्यामुळे वसुलीचे प्रमाण 100 टक्के आहे. 300 वर्षे जुन्या या मंदिराचे उत्पन्न दरवर्षी 2.5 लाख रुपयांहून जास्त आहे. 10 वर्षापूर्वी नवलपुरी महाराज समितीने आदर्श ट्रस्ट समिती स्थापन केली. समितीद्वारे शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. समितीने आजपर्यंत शेतकऱ्यास कर्ज देण्यास नकार दिला नाही. 2 हजार रु. प्रति बिघाप्रमाणे कर्ज दिले जाते. दरवर्षी 50-60 शेतकऱ्यांना ते मिळते.

  एकही रुपया बुडवला नाही

  शेतकरी रामअवतार मीणा यासंदर्भात म्हणाले, शेतकऱ्यांना एका वर्षात मुद्दल जमा करावे लागते. मी शेती खरेदी करण्यासाठी मंदिराकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रकमेवर व्याज घेतले जाणार नाही, त्यामुळे हे पैसे मला एका वर्षात परत करावयाचे आहेत. त्यामुळे मुद्दल जमा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कर्ज देण्याआधी कोणतीही हमी घेतली नाही. दुसऱ्या कोणाकडून कर्ज घ्यावयाचे झाल्यास जमीन गहाण ठेवावी लागते. परतफेड न झाल्यास हातची जमीन जाऊ शकते. मंदिराकडून कर्ज घेतल्यावर तशी धास्ती नाही. पांडोलीचे शेतकरी हरिओम मीणा म्हणाले, दरवर्षी मंदिराकडून शेतकऱ्यांना लाखोंचे कर्ज दिले जाते. मंदिराचा आजपर्यंत एक रुपयाही कोणी बुडवला नाही.

  दर गुरुवारी मेळा, हजारो रुपयांची बोली लागते

  पुजारी शंभूनाथ योगी यांच्यानुसार, 1100 लोकसंख्येच्या पांडोलीतील 50 टक्के लोकांनी कर्ज घेतले आहे. गुंसाई महाराज व त्यांचे शिष्य नवलपुरी महाराजांनी संवत 1772 मध्ये समाधी घेतली होती. लोकांनी मंदिराचे बांधकाम केले. दर गुरुवारी मंदिरात मेळा भरतो. यादरम्यान मंदिरात दान केलेली रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. या मंदिरावर मुस्लिमांचीही श्रद्धा आहे.