कोरोनाच्या औषधाच्या नावाखाली दिल्या विषाच्या गोळ्या, कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू

कोरोना (Corona Virus) औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्या आहेत. या घटनेत तिघांचा मृत्यू (Death By Taking Poisonous Pills) झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

    तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) हृदय हेलावणारी घटना घडली आहे. कोरोना (Corona Virus) औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्या आहेत. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीला विषबाधा झालेल्या या कुटुंबानं कर्ज दिलं होतं. ज्यावेळी या कुटुंबानं त्या व्यक्तीकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्यानं असं कृत्य केल्याचं समजतंय.

    तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडना आहे. काही महिन्यांपूर्वी ७२ वर्षीय करुप्पनकाउंडर यांनी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला १५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर गरज असल्यामुळे करुप्पनकाउंडर यांनी कल्याणसुंदरमकडे परत पैसे मागितले. कल्याणसुंदरम पैशांची परतफेड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यानं करुप्पनकाउंडर याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला.

    सबरी नावाच्या व्यक्तीच्या मदतीनं कल्याणसुंदरम यानं एक प्लान आखला. कल्याणसुंदरम यानं साबरीला आरोग्य विभागाचा कर्मचारी बनवून करुप्पनकाउंडर यांच्या घरी पाठवलं.

    २६ जूनला सबरी करुप्पनकाउंडर यांच्या घरी गेला. घरी गेल्यावर कुटुंबात कोणाला खोकला, सर्दी, ताप आहे का याची विचारणी केली. त्यानंतर सबरीनं करुप्पनकाउंडर यांच्याकडे विषाच्या गोळ्या दिल्या आणि या गोळ्यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढते असं सांगितलं. करुप्पनकाउंडर यानं या गोळ्या स्वतःही घेतल्या आणि पत्नी, मुलगी आणि घरात काम करणाऱ्या एका महिलेला दिल्या. गोळ्या घेतल्यानंतर चौघेही बेशुद्ध पडले.

    ही माहिती शेजाऱ्यांना लागताच त्यांनी चौघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र दुर्दैवानं करुप्पनकाउंडर यांची पत्नी मल्लिका, मुलगी दीपा आणि घरात काम करणारी महिला कुप्पल यांचा यात मृत्यू झाला आहे. तर करुप्पनकाउंडर यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री आरोपी कल्याणसुंदरम आणि सबरी यांना अटक केली आहे. दोघांनाही आता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.