crime

तीन तलाक आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात फरार झालेले माजी मंत्री चौधरी बशीर यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. अटकेपासून बचाव करण्यासाठी चौधरी बरेच प्रयत्न करीत होते. कोर्टाने बशीर यांची अंतरिम जामीन याचिका फेटाळून लावली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

    आग्रा : तीन तलाक आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात फरार झालेले माजी मंत्री चौधरी बशीर यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. अटकेपासून बचाव करण्यासाठी चौधरी बरेच प्रयत्न करीत होते. कोर्टाने बशीर यांची अंतरिम जामीन याचिका फेटाळून लावली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

    ते बसपा सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्याविरोधात नगमा हिने 31 जुलै रोजी मंटोला पोलिस स्थानकामध्ये तिहेरी तलाकची तक्रार दाखल केली होती. 11 नोव्हेंबर 2012 ला चौधरी बशीर यांच्यासोबत आपला विवाह झाला होता आणि बशीर यांच्यापासून आपल्याला दोन मुलेही असल्याचे नगमा यांनी तक्रारीत म्हटले होते.

    चौधरी बशीर हे त्यांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करत आहेत, असा आरोपही नगमा यांनी केला होता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून त्या माहेरी रहात असून बशीर यांच्याविरोधात कायदेशिर लढाई लढत आहेत. तसेच या दरम्यान 23 जुलैला चौधरी बशीर यांनी सहावा विवाह केल्याची आपल्याला माहिती मिळाली. यानंतर सासरी जावून जाब विचारला असता बशीर यांनी शिविगाळ करत आणि तिहेरी तलाक देत घरातून हाकलून दिल्याचा आरोपही पीडिता नगमा यांनी केला.

    नगमा यांच्या तक्रारीनंतर बशीर यांच्याविरोधात मंटोला पोलिस स्थानकामध्ये तिहेरी तलाकविरोधी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून चौधरी बशीर फरार झाले होते आणि पोलीस त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान बशीर यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली. दरम्यान, माजी मंत्री चौधरी बशीर यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर पोलिसांनी चौधरी बशीर यांना बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.