merath twin brothers died

एकाच दिवशी २४ वर्षीय दोन जुळ्या भावांचा मृत्यू (Twin brothers died)झाल्याचे समोर आले आहे.

    मेरठमध्ये(merath) धक्कादायक घटना घडली आहे. एकाच दिवशी २४ वर्षीय दोन जुळ्या भावांचा मृत्यू (Twin brothers died)झाल्याचे समोर आले आहे. जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी अशी या दोन भावांची नावं आहेत. २३ एप्रिल रोजी दोघांचा २४ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ताप आला. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

    या दोन्ही भावांनी एकत्र शिक्षण घेतलं. दोघेही कॉम्प्युटर इंजिनीअर झाले. दोघांनाही हैदराबादमध्ये नोकरी लागली. दोघांनाही कोरोनाची लक्षणं एकाच दिवशी दिसून आली आणि कोरोनाविरुद्धचा त्यांचा लढाही काही तासांच्या अंतराने संपला.

    जे एकाला व्हायचं तेच दुसऱ्यालाही व्हायचं. त्यांच्या जन्मापासूनच ते दोघे असे होते. आम्हाला जेव्हा जोफ्रेडच्या मृत्यूचं वृत्त समजलं तेव्हाच मी माझ्या पत्नीला राल्फ्रेड एकटा घरी येणार नाही असं म्हटलं होतं. जोफ्रेडचा मृत्यू १३ मे रोजी तर राल्फ्रेडचा १४ मे रोजी झाला. दोघांच्या मृत्यूमध्ये अवघ्या काही तासांचं अंतर होतं, असं जुळ्या भावांचे वडील राफेल म्हणाले.

    मेरठमधील कॅनॉनमेंट परिसरामध्ये राहणाऱ्या राफेल कुटुंबियांनी जोफ्रेड आणि राल्फ्रेडवर सुरुवातीला घरीच उपचार केले. साधा ताप असेल असं कुटुंबियांना वाटलं होतं. त्या दोघांची ऑक्सिजन लेव्हर ९० पर्यंत खाली आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.  एक मे रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना चाचणी केली असता दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र काही दिवसांनंतर दोघांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली होती, असंही राफेल सांगतात.

    दोघांनाही कोव्हिड वॉर्डमधून सामान्य आयसीयूमध्ये हलवण्याचा विचार डॉक्टर करत होते. मात्र त्या दोघांना दोन दिवस कोव्हिड वॉर्डमध्ये ठेऊन त्यांच्या प्रकृतीमध्ये काही चढ उतार होतोय का हे पहावं अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र अचानक १३ मे रोजी जोफ्रेडचा मृत्यू झाल्याचा कॉल आम्हाला रुग्णालयातून आला, असं राफेल सांगतात. राल्फ्रेडने त्याच्या आईला जॉफ्रेडचा मृत्यू झाला त्या दिवशीच शेवटचा कॉल केला होता.