odisha patnaik

नैसर्गिक आपत्तीमध्ये(Natural Calamity) चांगलं काम करत असल्याबद्दल ओडिसाचे मुख्यमंत्री पटनायक यांच्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेतली आहे

  नैसर्गिक आपत्तीमध्ये(Natural Calamity) चांगलं काम करत असल्याबद्दल ओडिसाचे मुख्यमंत्री पटनायक यांच्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेतली आहे. पटनायक हे आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील उत्तम यंत्रणा उभारणारे मुख्यमंत्री असून त्यांनी नैसर्गिक आपत्तीदरम्यान अनेकांचे प्राण वाचवल्याचं संयुक्त राष्ट्राने(United Nations Praised Chief Minister o Odisha) स्पष्ट केलं आहे.

  मामी मिझुतोरी यांनी एका मुलाखतीमध्ये पटनायक यांचं कौतुक केलं आहे. मिझुतोरी संयुक्त राष्ट्राच्या डिझास्टर रिस्क रिडक्शन म्हणजेच आपत्कालीन कालावधीमध्ये कमीत कमी नुकसान व्हावं यासाठीच्या सामितीचे प्रमुख आहेत.

  ओडिशाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये कारभार कसा हाताळावा तसेच अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी गुंतवणूक कशी करावी यासंदर्भातील आदर्श घालून दिल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात ओडिशाची तयारी पूर्वीपेक्षा अधिक चांगली आहे आणि ते यासंदर्भातील व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करु शकतात असंही मिझुतोरी यांनी म्हटलं आहे.

  मिझुतोरी यांनी, पटनायक यांनी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी उत्तम यंत्रणा उभारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती महत्वाची असते हे दाखवून दिलं. १९९९ साली नैसर्गिक आपत्तींमुळे ओडिशामध्ये समुद्रकिनारी राहणाऱ्या १० हजार जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कधीच मृत्यू झाले नाहीत, असंही म्हटलं आहे.

  २०१३ साली ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलेल्या फिलीन वादळानंतरही संयुक्त राष्ट्रांनी पटनायक यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मागील आठवड्यामध्ये आलेल्या यास वादळामुळे ओडिशातील सात लाख नागरिकांचं यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आलं होतं.

  ‘यास’ चक्रीवादळामुळे ओदिशात झालेल्या हानीचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. तेव्हा वरचेवर येणाऱ्या वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची व आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओडिशा सरकारच्या वतीने करण्यात आली.