जम्मू काश्मीरमधील भाजपच्या विजयाचा अर्थ, काश्मीर खोऱ्यातील राजकारणाला वेगळी दिशा

जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण २८० ठिकाणी या निवडणुका पार पडल्या. एकूण ४१८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी सर्वाधिक ७० ठिकाणी भाजपला विजय मिळालाय. भाजपनं या निवडणुकीत ४,४२,९९४ मतं मिळवली.

जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांसाठी (DDC) झालेल्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. हे निकाल भाजपसाठी दिलासादायक आहेत. विशेषतः जम्मूमध्ये भाजपनं मिळवलेलं यश भाजपचा आत्मविश्वास वाढवणारं असून काश्मीरमध्येदेखील भाजपनं तीन जागा मिळवत चंचूप्रवेश केलाय.

कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आलाय. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आलं. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. या निर्णयानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. या निकालातून ३७० कलम हटवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे संकेत जनतेनं दिल्याचं भाजपनं म्हटलंय.

हिंदुबहुल जम्मूमध्ये भाजपनं मुसंडी मारलीच, पण मुस्लिमबहुल काश्मीरमध्येदेखील भाजपनं तीन जागा मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील सात पक्ष एकत्रितपणे गुपकार आघाडी करून ही निवडणूक लढवत होते. यात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा समावेश होता. भाजपनं एकहाती निवडणूक लढवून जम्मू काश्मीरमधील सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असा नावलौकिकदेखील मिळवलाय. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’च्या घोषणा दिल्या.


जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण २८० ठिकाणी या निवडणुका पार पडल्या. एकूण ४१८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी सर्वाधिक ७० ठिकाणी भाजपला विजय मिळालाय. भाजपनं या निवडणुकीत ४,४२,९९४ मतं मिळवली.