elephant

सध्या एका हत्तीचा व्हिडिओ(Elephant`s Video) व्हायरल होत आहे. आपल्या  माहूताच्या निधनानंतर त्याला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे.

    तिरुअनंतपुरम : सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडिओ(Viral  Video) व्हायरल होत असतात.सध्या एका हत्तीचा व्हिडिओ(Elephant`s Video) व्हायरल होत आहे. आपल्या  माहूताच्या निधनानंतर त्याला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या माहूताच्या पार्थिवासमोर हत्तीने सोंडेने मानवंदना दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

    केरळमधील कोट्टायममध्ये (Kottayam) ही मन हेलावून टाकणारी घडना घडली. कुण्णक्कड दामोदरन नायर यांना प्रेमाने ओमानचेत्तन  म्हटलं जात असे. हत्तींवर ते लेकरांप्रमाणे प्रेम करत असत. जवळपास ६० वर्ष ते विविध हत्तींचा सांभाळ करत होते. ओमानचेत्तन यांनी ३ जून रोजी अखेरचा श्वास घेतला.ते ७४ वर्षांचे होते.

    ओमानचेत्तन यांच्या निधनाने नायर कुटुंबावर शोककळा पसरली. जितकं दुःख नायर परिवाराला झालं, तितकाच ओमानचेत्तन यांच्या कुटुंबातील हत्तींनाही शोक अनावर झाला. पल्लट ब्रह्मदातन या हत्तीला आपल्या माहूताच्या निधनाचं खूप दु:ख झालं.

    ओमानचेत्तन यांच्या निधनाचं वृत्त समजल्यावर पल्लट ब्रह्मदातन या हत्तीचे मालक त्याला घेऊन अंत्यदर्शनासाठी आले. यावेळी माहूताच्या पार्थिवासमोर सोंड उंचावून हत्तीने अखेरचा सलाम केला. त्यानंतर तो अक्षरशः नतमस्तक झाला. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

    केरळातील महत्त्वाच्या सण समांरभांवेळी ब्रह्मदातन आणि ओमानचेत्तन या हत्ती-माहूताची जोडी नेहमी उपस्थित राहत असे.