मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतायत?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरातचा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का? ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत?”, असा बोचरा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

    नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर पंतप्रधानांनी गुजरातमधील या नुकसानग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. यावरुन आता राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत.

    दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गुजरातसाठी जाहीर केलेल्या या आर्थिक मदतीनंतर राजकीय वर्तुळातून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. विरोधकांकडून फक्त गुजरात दौरा आणि आर्थिक मदत यावरून मोदींवर मोठी टीका झाली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पंतप्रधान मोदींवर एका ट्विटद्वारे टीका केली आहे.

    पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ?

    पृथ्वीराज चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “CycloneTauktae मुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील ५ राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरातचा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का? ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत?”, असा बोचरा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

    विरोधकांकडून मोदींवर होणाऱ्या टिकांवर स्पष्टीकरण देताना भाजपमधून असे सांगण्यात येते की, केंद्र सरकारने तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या देशभरातील सर्व नुकसानग्रस्त भागांतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण विरोधकांकडून मात्र मोदींवर “फक्त गुजरातचे पंतप्रधान” असल्याची टीका केली जाते.