बँकेत चोरी करण्यासाठी तिने लढवली आयडियाची कल्पना पण ‘या’ कारणामुळे फसला डाव, वाचा सविस्तर

दोन दिवसांपासून बेपत्ता( असलेली महिला (Missing Woman Found In Bank)एका बँकेमध्ये सापडल्याचं समोर आलं आहे. इसाबेला मारबोह (Isabela Marboh) असं या महिलेचं नाव आहे.

    मेघालय : मेघालयमध्ये (Meghalaya) एक अजब घटना घडली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला एका बँकेमध्ये सापडल्याचं समोर आलं आहे. इसाबेला मारबोह (Isabela Marboh) असं या महिलेचं नाव आहे. ही ४० वर्षीय महिला शुक्रवारी चोरीच्या उद्देशानं बँकेत शिरली होती. मात्र बँकेला शनिवार, रविवार सुट्टी असल्यानं ती आतच अडकली. अखेर सोमवारी बँक उघडल्यावर ती सापडली. तोपर्यंत तहानभुकेनं तिची अवस्था वाईट झाली होती.

    पोलिसांनी इसाबेलाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिला शिलाँग यूथ सेंटरमधील (Shillong Youth Center) क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आलं आहे.तिच्याविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाबेला मारबोह शुक्रवारी संध्याकाळी चोरीच्या उद्देशानं घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या बँकेत गेली. बँकेत शिरल्यानंतर सर्व्हर रूममध्ये (Server room) लपून राहायचं आणि बँक बंद झाल्यानंतर स्ट्राँगरूममध्ये शिरून पैसे चोरायचे आणि दुसऱ्या दिवशी बँक उघडली की बाहेर पडायचं अशी तिची योजना होती. आपलं काम करण्यासाठी तिनं काही हत्यारंही सोबत घेतली होती. तसंच रात्रभर खाण्यासाठी तिनं चॉकलेट आणि ओआरएस (ORS) घेतलं होतं.

    शुक्रवारी संध्याकाळी घरात भाजी खरेदी करायला जाते असं सांगून ती पैसे जमा करण्याच्या बहाण्यानं बँकेत गेली. नंतर कुणाचे लक्ष नाही असं पाहून हळूच सर्व्हर रूममध्ये शिरून लपून बसली. बँक बंद झाल्यानंतर ती थेट स्ट्राँग रूममध्ये गेली. परंतु तिच्याकडे स्ट्राँग रूमचे लॉकर तोडण्यासाठी आवश्यक ती साधनं नव्हती. कात्रीच्या सहाय्यानं तिनं ते उघडण्याचा प्रयत्न केला. पण तिला यश आलं नाही. सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग झालं असेल या भीतीनं तिनं सीसीटीव्हीही (CCTV) फोडला.

    दुसर्‍या दिवशी सकाळी बँक उघडल्यावर बाहेर पडण्याचं तिनं ठरवलं. पण दुसर्‍या दिवशी महिन्याचा चौथा शनिवार असल्यानं बँकेला सुट्टी होती. त्यानंतर रविवार होता. त्यामुळं इसाबेला तीन रात्री बँकेतच अडकून पडली. तिनं नेलेली काही चॉकलेट्स आणि ओआरएस पहिल्याच दिवशी संपून गेली होती. त्यामुळं पुढचे दोन्ही दिवस तिला अन्नपाण्याविना काढावे लागले. त्यामुळं सोमवारी तिची अवस्था अतिशय वाईट झाली होती. सोमवारी बँक उघडली तेव्हा इसाबेला तिथं आढळून आली. त्यावेळी बँकेच्या मॅनेजरने इसाबेलाच्या नवऱ्याला आणि पोलिसांना फोन केला.