‘झोमॅटो’च्या डिलिव्हरी बॉयचा महिलेवर हल्ला, या कारणामुळे फोडले महिलेचे नाक

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दुपारच्या वेळेत झोमॅटोवरून काही अन्नपदार्थ ऑर्डर केले. मात्र बराच वेळ झाला तरी ऑर्डर न आल्याने या महिलेने ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. ऑर्डर रद्द करण्यासाठी कस्टमर केअरशी ती संवाद साधत असतानाच दरवाजावरची बेल वाजली. तिनं दार उघडल्यावर दारात डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आल्याचं तिला दिसलं. 

  झोमॅटो ऍपवरून केलेली ऑर्डर रद्द केल्याचा राग आल्यामुळे एका डिलिव्हरी बॉयने एका महिलेवर थेट हल्ला चढवला. डिलिव्हरी बॉयने केलेल्या हल्ल्यात या महिलेच्या नाकाला इजा झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. हा प्रकार घडला बंगळुरू शहरात.

  बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दुपारच्या वेळेत झोमॅटोवरून काही अन्नपदार्थ ऑर्डर केले. मात्र बराच वेळ झाला तरी ऑर्डर न आल्याने या महिलेने ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. ऑर्डर रद्द करण्यासाठी कस्टमर केअरशी ती संवाद साधत असतानाच दरवाजावरची बेल वाजली. तिनं दार उघडल्यावर दारात डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आल्याचं तिला दिसलं.

  या महिलेने आपण ऑर्डर रद्द करण्याची प्रक्रिया करत असून ती ऑर्डर नको असल्याचं सांगितलं. याचा त्या डिलिव्हरी बॉयला राग आला. आपण आणलेली ऑर्डर रद्द होत असल्याचं पाहून त्याचं अर्वाच्य भाषेत शिविगाळ करायला सुरुवात केली. त्या महिलेने डिलिव्हरी बॉयला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उर्मटपणा वाढतच गेला. अखेर त्याचं हिंसक रूप पाहून त्या महिलेनं घराचा अर्धवट उघडलेला दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला.

  ते पाहून अर्धवट उघडलेले दार जोराने ढकलत डिलिव्हरी बॉय आत आला. त्याने तिथे ते पार्सल ठेवले आणि महिलेच्या चेहऱ्यावर जोरदार धक्का दिला. यात महिलेच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. ते पाहून डिलिव्हरी बॉयनं तिथून पळ काढला. या महिलेने उपचारासाठी हॉस्पिटल गाठले, तेव्हा नाकाचे हाड फ्रॅक्चर असल्याचे तिच्या लक्षात आले. तिला त्यासाठी सर्जरी करून घ्यावी लागली.

  हा सगळा प्रकार घडत असताना सोसायटीतील कुणीही याची दखल घेतली नसल्याबद्दल महिलेनं आश्चर्य आणि दुःख व्यक्त केलंय. आपल्या सोसायटीतील एका महिलेवर हल्ला होत असताना आजूबाजूने जाणाऱ्यांना त्याचा काहीच फरक पडत नव्हता. या डिलिव्हरी बॉयला रोखण्याचा किंवा साधा जाब विचारण्याचं धाडसही कुणी केलं नाही. पोलिसांनी मात्र आपल्याला चांगलं सहकार्य केल्याचं या महिलेनं सांगितलं.

  झोमॅटो कंपनी प्रशासनानं या प्रकाराबद्दल महिलेची माफी मागितली असून डिलिव्हरी बॉयवर कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर या महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च करण्याची तयारीदेखील दाखवली आहे.