लसीचे दोन्ही डोस घेऊनही कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजच्या १८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ? कॅम्पसमधल्या फ्रेशर्स पार्टीनंतर संसर्ग वाढल्याचा अंदाज

धारवाड(Dharwad) येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये(SDM College Of Medical Science) १८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची(182 Medical Students Found Corona Positive) लागण झाली आहे.

    कर्नाटकातील (Karnatak)धारवाड(Dharwad) येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये(SDM College Of Medical Science) १८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची(182 Medical Students Found Corona Positive) लागण झाली आहे. गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा ६६ इतका होता. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले होते. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वीच फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

    या मेडिकल कॉलेजमध्ये एकूण ४०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी १८२ विद्यार्थींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एका आठवड्यापूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार ६६ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असून आज उर्वरित १०० जणांची चाचणी केली जाणार आहे. या कॉलेजशी संबंधित कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या संसर्ग झालेल्यांना विलगीकरणामध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

    आरोग्य अधिक्षक असणाऱ्या डी. रणदीप यांनी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या चाचण्यांनंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठीही हे नमुने पाठवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाचा हा विस्फोट एखाद्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे झालेला नाही ना? हे तपासून पाहण्यासाठी या चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

    हुबळी-धारवाडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, यशवंत म्हणाले की, संसर्ग झालेल्यांपैकी अनेकांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस मिळाले होते. सध्या या सर्वांना हॉस्टेलमध्येच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं आहे. या संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं आढळलेली नाहीत.राज्याच्या आरोग्य विभागामने या कॉलेज आणि कॉलेजशी संबंधित रुग्णालयामधील जवळजवळ तीन हजार कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.