भयंकर ! पश्चिम बंगालमध्ये आढळले २०० क्रूड बॉम्ब, राज्यभरात खळबळ

पश्चिम बंगालमधील साऊथ २४ परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरात पोलिसांना हे बॉम्ब आढळून आले. एकाच जागी तब्बल २०० बॉम्ब सापडणं, ही मोठी कारवाई मानली जातेय. हे बॉम्ब कुणी आणले होते आणि त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, याचा तपास पोलिसांनी सुरु केलाय. 

    पश्चिम बंगालमध्ये जवळपास २०० क्रूड बॉम्बचा साठा आढळल्यामुळे एकच खळबळ उडालीय. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढत असताना क्रूूड बॉम्ब आढळून आल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झालीय.

    गेल्याच आठवड्यात साऊथ २४ परगण्यात क्रूड बॉम्बचा स्फोट झाला होता. या हल्ल्यात एका भाजप कार्यकर्त्याला आपले प्राण गमवावे लागले होते. तर पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळेतय. कोलकात्यामधील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    जे कार्यकर्ते जखमी झाले, ते स्वतःच बॉम्ब तयार करत होते, असा संशय पश्चिम बंगाल पोलिसांनी व्यक्त केलाय. बॉम्ब तयार करत असतानाच तो फुटल्यामुळे ते जखमी झाल्याचं सांगिितलं जातंय. तर दुसरीकडे आम्ही जेवत असताना कुणीतरी येऊन आमच्यावर बॉम्ब फेकले, असा दावा जखमी कार्यकर्त्यांनी केलाय.

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. जागोजागी गस्त घालण्यात येत असून प्रत्येक संशयास्पद हालचाल तपासली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून एका जागी साठवून ठेवलेले २०० बॉम्ब पकडण्यात पोलिसांना यश आलंय. आगामी काळात पोलिसांपुढचं आव्हान अधिक कठीण होणार आहे.