लग्नपत्रिकेत नाव छापलं नाही म्हणून त्यांची सटकली, वाद वाढल्यावर चाकू बाहेर काढून….

लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत(Marriage Invitation Card) सर्व ज्येष्ठांची नावं होती; मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता.

    लग्नपत्रिकेत (Invitation Card) नाव न छापणं हे कोणाला मारण्याचं कारण होऊ शकतं का?  खरंतर नाही. मात्र अशी दुर्दैवी घटना हैदराबादमध्ये (Hyderabad) तुकारामगेट परिसरात रविवारी घडली आहे. चार व्यक्ती यात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    तुकारामगेट परिसरातल्या आझाद चंद्रशेखर नगरमध्ये इलेक्ट्रीशियन म्हणून काम करणारे शेखर आणि सर्वेश  या दोन आरोपींनी हे कृत्य केलं. १६ जून रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व ज्येष्ठांची नावं होती; मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता. त्यावरून त्यांचं आणि यादगिरी नावाच्या त्यांच्या एका नातेवाईकाचं भांडण झालं. या दोघा आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आपल्या आई-वडिलांची नावं छापली गेली नसल्याचा आरोप केला. त्यातून वादाची ठिणगी आणखी पेटली.

    हा वाद मिटवण्यासाठी यादगिरी यांच्यासह प्रवीण, परशुराम, प्रताप हे त्यांचे कुटुंबीय रविवारी सकाळी ७ वाजता दोघा आरोपींच्या घरी आले. त्यावेळी शेखर आणि सर्वेश या आरोपींनी यादगिरीच्या पत्नीला उद्देशून असभ्य भाषेचा वापर केला. दोन गटांत झालेल्या भांडणावेळी शेखरने दुसऱ्या गटावर चाकूहल्ला केला. सर्वेशने त्याला साथ दिली. त्यात यादगिरी (Yadgiri) आणि प्रताप यांना किरकोळ जखमा झाल्या. प्रवीणच्या पोटात, तर परशुरामच्या छातीत चाकूने भोसकलं (Stabbed) गेल्याने गंभीर जखमा झाल्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, आरोपी (Accused) शेखर आणि सर्वेश फरारी झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.