चंदीगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून भाजपचा मोठा उमेदवार पराभूत

आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party Victory In Chandigarh) भाजपला मोठा धक्का दिला आहे. चंदीगडचे माजी भाजप महापौर देवेश मोदगिल यांना आपच्या जसबीर सिंह (Jasbir Singh) यांनी ९३९ मतांनी हरवले.

    चंदीगड: चंदीगड महापालिका निवडणुकीत (Chandigarh Corporation Election Results)प्रथमच उतरलेल्या आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party Victory In Chandigarh) भाजपला मोठा धक्का दिला आहे. चंदीगडचे माजी भाजप महापौर देवेश मोदगिल यांना आपच्या जसबीर सिंह (Jasbir Singh) यांनी ९३९ मतांनी हरवले. वॉर्ड क्रमांक २३ मधून महापौर देवेश मोदगिल उभे होते. मात्र चंदीगड महापालिकेत प्रथमच उतरलेल्या आम आदमी पार्टीने त्यांना जबरदस्त धोबीपछाड दिल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून महापालिका निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे भाजपच्या प्रभावी उमेदवाराचा हा पराभव पुरेसा बोलका असल्याचे म्हटले जात आहे.

    चंदीगड महापालिका निवडणुकीसाठी २४ डिसेंबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत ६० टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरु असून यात भाजपच्या माजी महापौरांचा पराभव झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत २१ जागांचा कौल समोर आला असून त्यात आप-९, काँग्रेस ५, भाजप ६, अकाली दलाने १ जागेवर आघाडी घेतली आहे. मतांची मोजणी अजूनही सुरुच आहे. आतापर्यंत १४ जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात भाजपने ५, काँग्रेसने २ आणि आम आदमी पार्टीने ६ जागांवर विजय मिळवला आहे. अकाली दलाने एका जागेवर विजय मिळवला आहे. यंदा आम आदमी पार्टीने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना हादरा दिल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    आम आदमी पक्षाच्या दमनप्रीत यांनी वॉर्ड क्रमांक १७ मधून भाजपचे महापौर रविकांत यांनाही हरवले आहे. चंदीगड भाजप अध्यक्ष आपला वॉर्डही वाचवू शकले नाहीत. अध्यक्ष वरूण सूद यांच्या वॉर्डातूनही आम आदमी पक्षाने विजय मिळवला. या वॉर्डात सूद यांनी स्वतः निवडणूक न लढवता युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय राणा यांना उमेदवारी दिली होती. यासोबतच वॉर्ड क्रमांक २६ मधून भाजपचे माजी महापौर राजेश कालिया यांचाही मोठा पराभव झाला. काँग्रेसच्या जतिंदर कुमार यांनी त्यांना १४४० मतांनी पराभूत केले.

    महापालिका निवडणुकीत भाजपने २० जागा जिंकल्या होत्या. तर आधीच्या युतीतील पक्षाने म्हणजेच शिरोमणी अकाली दलाने एक जागा पटकावली होती. तर काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला होता. मागील पाच वर्षात भाजप विकास कामे करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केला आहे.