मासिक हप्त्यासाठी एजंट घराबाहेर येऊन बसला म्हणून त्याने घेतला टोकाचा निर्णय, ‘त्या’ प्लंबरच्या आत्महत्येने उडाली खळबळ

साधन यांनी दुचाकीसाठी(Vehical Loan) जानेवीरा महिन्यात एक लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र मे आणि जून महिन्यात ३४०० रुपयांचा हप्ता ते भरु शकले नव्हते. साधन सिन्हा महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमवत होते. पण कोरोना काळात त्यांच्या मुलाच्या कमाईचा मार्ग बंद झाला होता.

  मासिक हप्त्यासाठी(EMI) खासगी वित्त कंपनीच्या एजंटकडून होणारा अपमान आणि मानसिक छळाला कंटाळून एकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.पश्चिम बंगालमध्ये(West Bengal) ही दुर्दैवी घटना घडली आहे. हप्त्यासाठी एजंट घराबाहेरच बसून राहत असल्याने पीडित व्यक्तीला अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. अखेर प्लंबर म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.

  साधन सिन्हा असं या ४० वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्यांची मुलं अद्याप अल्पवयीन आहेत.

  साधन यांनी दुचाकीसाठी जानेवीरा महिन्यात एक लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र मे आणि जून महिन्यात ३४०० रुपयांचा हप्ता ते भरु शकले नव्हते. साधन सिन्हा महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमवत होते. पण कोरोना काळात त्यांच्या मुलाच्या कमाईचा मार्ग बंद झाला होता.

  जास्त काम मिळावं यासाठी त्यांनी दुचाकी विकत घेतली होती असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण दोन महिने ते हप्ता फेडू शकले नव्हते. जेव्हा साधन सिन्हा यांनी हप्ता भरला नाही तेव्हा रिकव्हरी एजंट सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी पोहोचले आणि जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत जाणार नाही असं सांगितल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

  “आम्हाला अजून काही दिवस द्या अशी भीक त्यांच्याकडे मागत होते. पण जोपर्यंत हप्त्याचे पैसे मिळत नाहीत तोवर आम्ही जाणार नाही सांगत ते घऱाबाहेर बसले. माझ्या पतीला इतकं अपमानित वाटत होतं की त्यांनी आत्महत्या केली,” असं पत्नीने सांगितलं आहे.

  पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, “एजंट घराबाहेर बसले होते तेव्हा साधन यांनी स्वत:ला घरात बंदिस्त करुन घेतलं. मी जेव्हा त्यांना शोधायला गेले तेव्हा त्यांनी बेडरुमचा दरवाजा बंद केला होता. खूप वेळा आवाज दिल्यानंतर खिडकीतून पाहिलं तेव्हा त्यांनी पंख्याला गळफास लावून घेतला होता”.