तामिळनाडूत(Tamilnadu) २४ मे ते ३१ मे या काळात कठोर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या काळात कोणत्याही कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली होती. मात्र २३ मे रोजी, पुढे आठवडाभर कठोर लॉकडाऊन(Lockdown) असल्याने २४ तासांची सूट देण्यात आली होती.

    मदुराई: लॉकडाऊनच्या(Lockdown) काळात ३० हजार फूट उंचीवर लग्न करणारं तामिळनाडूतील जोडपं सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे. मदुराईत(Madurai) राहणाऱ्या या जोडीनं कोरोनाच्या काळातही आपलं लग्न संस्मरणीय केले आहे.

    विमानात लग्न(marriage in airoplane) करुन, ते आपल्या आठवणीत राहावं, हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं, ते स्वप्न त्यांनी लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण केले आहे. तामिळनाडूत २४ मे ते ३१ मे या काळात कठोर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या काळात कोणत्याही कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली होती. मात्र २३ मे रोजी, पुढे आठवडाभर कठोर लॉकडाऊन असल्याने २४ तासांची सूट देण्यात आली होती. या २४ तासांत मदुराईच्या मंदिरांबाहेर लग्न करण्यासाठी जोडप्यांची रीघ लागलेली पाहायला मिळाली.

    मदुराईच्याच राकेश आणि दीक्षा यांनीही याच दिवशी लग्न केले, पण ते विमानात. या सोहळ्यासाठी १३१ पाहुणे उपस्थित होते. खरंतर या दोघांचं लग्न २० मेला पार पडलं होतं. पण त्या सोहळ्याला कोरोनामुळे कमी पाहुणे उपस्थित राहू शकले. राज्य सरकारने एका दिवसाची सूट दिल्यानंतर, आपलं स्वप्नातलं लग्न वास्तवात आणण्याचं या जोडप्याने ठरविले आणि हा विमानातील विवाह सोहळा पार पडला.

    या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या होत्या, आणि ते निगेटिव्ह असल्याचे माहित करुनच त्यांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आले होते, असे या जोडप्याचे म्हणणे आहे.

    सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
    या विमानातील लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, या लग्नाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात असे मोठे लग्न करणे, चुकीचे आहे असा एक मतप्रवाह आहे. लग्न आत्ताच एवढे मोठे करण्याची गरज नसल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.

    लग्नाच्या फोटोंमध्ये सहभागी असणाऱ्यांनी मास्कही लावले नसल्याचे दिसते आहे. विमानात झालेले हे लग्न कायद्याचे वेगळेच उल्लंघन असून, आता या प्रकरणी काय कारवाई करायची, याचा विचार पोलीस करत आहेत.

    तामिळनाडूत सध्या दरदिवशी ३५ हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत, त्यामुळेच एक आठवडा कठोर लॉकडाऊनची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे.