‘… पण भाजपाला निवडणुकीत मोठा रसगुल्लाच मिळणार’ ममतांचा गृहमंत्री अमित शहांना टोला

“पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजपा असे दावे का करत आहे. केंद्रीय संस्थांनीही उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामे करावे . लोकांना भाजपाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये- ममता बॅनर्जी

    देशात एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चाही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची होत आहे. केंद्रासह विविध राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाने बंगाल काबिज करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले असून, ममतांच्या तृणमूलला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. या दाव्यावरून ममतांनी शाह यांना टोला लगावला आहे.

    “भाजपा सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकी जागा त्यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीसाठी सोडल्या आहेत का? पण, भाजपाला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे,” असा टोला ममतांनी चंदीपूर येथील प्रचार सभेत बोलताना भाजपासह आणि अमित शाह यांना लगावला आहे

    “पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजपा असे दावे का करत आहे. केंद्रीय संस्थांनीही उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामे करावे . लोकांना भाजपाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये,” अशी टीकाही ममतांनी केली.

    पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपाची भगवी लाट आल्याचे संकेत मिळाले. पहिल्या टप्प्यात तेथे ३६ जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपाला मिळतील आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा भाजप नेते अमित शहा यांनी केला आहे.