भुताची भीती वाटते म्हणून माहिती देऊ शकत नाही ; RTI कार्यकर्त्यांना उत्तर देण्यास वैद्यकीय महाविद्यालयाचा नकार

मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ग्वाल्हेरमधल्या गजरा राजा वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या उत्तराने हसावं का रडावं हा प्रश्न पडला आहे. या महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या अॅडमिशनमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा आरोप केला जात आहे.

    माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास या महाविद्यालयाने नकार दिला आहे. भुताची भीती वाटत असल्याने आपण ही माहिती देऊ शकत नाही. असं प्रशासनाने या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कळवलं आहे.मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ग्वाल्हेरमधल्या गजरा राजा वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या उत्तराने हसावं का रडावं हा प्रश्न पडला आहे. या महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या अॅडमिशनमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा आरोप केला जात आहे.

    हे प्रकरण खणून काढण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ज्या विद्यार्थ्यांबाबत त्यांना संशय वाटतोय त्यांच्या अधिवासाच्या दाखल्यासंदर्भात माहिती मागवली होती. या विद्यार्थ्यांनी खोट्या डोमिसाईल सर्टिफिकेटच्या आधारे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचा संशय आहे. मात्र ही माहिती देण्यास महाविद्यालय प्रशासनाने नकार दिला आहे.

    पंकज जैन नावाच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने या प्रकाराबाबत माहिती देताना सांगितले की सुरुवातीला महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की जो लिपीक कागदपत्रांची खोली सांभाळतो त्याला सीबीआयने अटक केली आहे. कालांतराने प्रशासनाने सांगितलं की या लिपीकाने आत्महत्या केली आहे. ज्या खोलीत सगळी कागदपत्रे ठेवली आहेत, त्याच खोलीत या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आणि त्याचं भूत तिथे वावरत असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं.