voting

काँग्रेसने (Congress) पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) पहिली यादी जाहीर केली आहे.

    चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) काँग्रेसने (Congress List Of Election Candidates) पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण ८० उमेदवारांच्या या यादीत राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना पुन्हा एकदा चमकौर साहिबमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyotsingh Siddhu) यांना अमृतसर पूर्वमधून तर अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांना मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

    काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले वादग्रस्त पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हे मानसामधून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रताप सिंह बाजवा हे गुरुदासपूरच्या कादियांमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हे निवडणूक लढणार नाहीत. त्यांचे पुतणे संदीप जाखड यांना अबोहरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा हे डेरा बाबा नानक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
    काँग्रेसने ८६ पैकी केवळ ९ जागांवर महिलांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महिलांना ४० टक्के सीट देण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले सुखपाल खैहरा यांना भुलत्थ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. खैहरा हे आपमधून काँग्रेसमध्ये आले होते. ते भुलत्थ येथील आमदार आहेत.

    पंजाबमध्ये एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेससमोर आपचं मोठं आव्हान राहणार आहे.