Cyclone likely in Tamil Nadu, Kerala

दिल्ली : बंगालच्या उपसागरातून आणखी एक वादळ घोंघावत असून ज्यामुळे तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये प्रभावित होऊ शकतात, असा इशारा भारतीय हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच चक्रीवादळाने दक्षिणेच्या राज्यांमध्ये कहर केला होता. याला अवघा एक आठवडा उलटत नाही तोच आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ ३ डिसेंबरला श्रीलंकेचा किनारा पार करेल. यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले दाबाचे पट्टे अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि पुढील २४ तासांत याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

आयएमडीने सांगितले की, पश्चिम-उत्तर-पश्चिमच्या दिशेने वाढत आणि दोन डिसेंबरच्या संध्याकाळी अथवा रात्री हे वादळ श्रीलंकेचा किनारा पार करण्याची शक्यता आहे. तीन डिसेंरला दक्षिण तामिळनाडूच्या कन्याकुमारी, तिरूनेलवेल्ली, थुथुकुडी, तेनकासी, रामनाथपुरम आणि शिवगंगा भागांमध्ये याचा प्रभाव दिसू शकतो. कोमोरिन भाग, मुन्नारची खाडी, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप किनारा भागांना वादळाचा फटका बसू शकतो. येथे दोन ते 4 डिसेंबरदरम्यान वादळाचा कहर निर्माण होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे या भागातील समुद्रांमध्ये मच्छिमारीसाठी न जाण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे.