charanjit singh channi

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी (Ed Raid In Punjab) केली आहे.

    चंदीगड: पंजाबमध्ये विधानसभा (Punjab Assembly Election 2022) निवडणुकीची तयारी सुरु आहे. अशातच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी (Ed Raid In Punjab) केली आहे. बेकायदेशीररित्या सँड मायनिंग सुरू असल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. भूपेंद्र सिंग हनी या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या (Ed Raid At Channi’s Relatives House) घरावर छापे मारण्यात आले आहेत. ईडीच्या ८ सदस्यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे. तसेच ईडीने राज्यात अन्य दहा ठिकाणीही छापेमारी केली आहे.

    ईडीच्या टीमने आज सकाळी ८ वाजता मोहालीतील होमलँड सोसायटीतील भूपेंद्र सिंह हनी यांच्या फ्लॅटवर छापा मारला. त्यानंतर ईडीने भूपेंद्र सिंग हनी यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. ईडीची छापेमारी अजूनही सुरू असून या ठिकाणी सीआरपीएफच्या टीमचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    भूपेंद्र सिंग हनी यांच्या घरासहीत संपूर्ण पंजाबमध्ये १०-१२ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. भूपेंद्र सिंग यांच्यावर बेकायदेशीरपणे वाळू उपसाचे कंत्राट घेतल्याचा आरोप आहे. हा ठेका मिळवण्यासाठी त्यांनी पंजाब रियल्टर्स नावाची एक फर्म बनवली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ही छापेमारी सुरू असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. आधी पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होतं. मात्र, संत रविदासांची जयंती असल्याने ही निवडणूक चार दिवसाने पुढे ढकलण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली आहे.

    यापूर्वीही बेकायदा वाळू उपश्याचा मुद्दा राज्यात तापला होता. माजी आमदार सुखपाल सिंग खैहरा यांनी या प्रकरणावर सर्वात आधी आवाज उठवला होता. खैहरा यांनी या प्रकरणी थेट चन्नींवर आरोप केला होता. त्यावेळी चरणजीत सिंग चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण मंत्री होते. मात्र, त्यावेळी चन्नी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. भूपेंद्र सिंग यांच्या बेकायदेशीर वाळू उपसा ठेकेदारीत चन्नी यांनी ढवळाढवळ केली आहे का याची चौकशी ईडी करत आहे. अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपयांची माया जमवल्या गेल्याची शंकाही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.