होणाऱ्या पतीला तिनं व्हिडिओ कॉल केला अन् फोन सुरु असतानाच केली आत्महत्या, बातमीने उडाली खळबळ

एका तरुणीनं आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्यानं आत्महत्या (Girl Committed Suicide While Talking On Video Call) केली असल्याचं समोर आलं आहे.

    लखनऊ :आजकाल आत्महत्यांचे प्रमाण वाढलं आहे. एका तरुणीनं आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्यानं आत्महत्या (Girl Committed Suicide While Talking On Video Call) केली असल्याचं समोर आलं आहे. ज्यावेळी तिनं गळफास घेतला, त्यावेळी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत  व्हिडिओ कॉलवर (Video Call) बोलत होती. आपल्या होणाऱ्या पत्नीला आत्महत्या करताना या युवकानं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहिलं. यानंतर त्यानं पोलीस आणि घरच्यांना याबाबतची माहिती दिली. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवांच्या महुआपार गावातील आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तरुणीनं आत्महत्येचं पाऊल का उचललं, हे अजून कळलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या होणाऱ्या पतीला चौकशीसाठी बोलावलं आहे. महुआपारमधील रहिवासी लालचंद यांनी आपली मुलगी कुमारी पूजा हिचं लग्न संतकबीरनगर जिल्ह्यातील युवकासोबत ठरलं होतं. मे महिन्यात हे लग्न होणार होतं पण झालं नाही.

    यादरम्यान पुजाचं आपल्या होणाऱ्या पतीसोबत फोनच्या माध्यमातून बोलणं होत होतं. युवक नोएडामध्ये नोकरी करतो. मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितलं, की तिच्या मृत्यूची माहिती नोएडामधून तिच्या होणाऱ्या पतीनं आधी दिली. जेव्हा मी तिच्या रुमकडे गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून तिला खाली उतरवलं गेलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

    कुटुंबातील सदस्यांनी अद्याप याबाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की हे प्रकरण पाहता असं वाटतं, की तरुणीनं कुठल्या तरी गोष्टीमुळे नाराज असल्यानं लाईव्ह सुसाईड केली आहे. याच कारणामुळे तिच्या होणाऱ्या पतीला या गोष्टीची माहिती आधी मिळाली याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.