‘इस्लाम’ सोडून स्वीकारला ‘हिंदू’ धर्म; तरुणाला मिळताहेत हत्येच्या धमक्या

हिंदू धर्मातून मुस्लीम धर्मात प्रवेश करण्याच्या आरोपावरून गेल्या काही दिवसांत अनेक तरुण-तरुणींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले होते. परंतु, या प्रकरणात मात्र मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या तरुणाला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. धर्मांतर करणाऱ्या तरुणाला धमक्या मिळत असल्याने त्याला सुरक्षा पुरवण्यात आल्याचे स्पष्टीकरण उत्तरप्रदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.

लखनौ: उत्तरप्रदेशात नव्या धर्मांतरविरोधी कायद्यानुसार, धर्मांतरापूर्वी दोन महिने अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी अलीगढमध्ये एका मुस्लीम तरुणाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय धर्मांतर करत हिंदू धर्मात प्रवेश केला. त्याचं धर्मांतर घडवून आणणाऱ्या हिंदू संघटनांनाही कायद्याप्रमाणे पूर्वपरवानगी घेणं आवश्यक वाटले नाही. तसेच पोलिसांनाही याची आवश्यकता वाटली नाही. उलट पोलिसांकडून तरुणाला सुरक्षा पुरवण्यात आली. पोलिसांची ही दुटप्पी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, हिंदू धर्मातून मुस्लीम धर्मात प्रवेश करण्याच्या आरोपावरून गेल्या काही दिवसांत अनेक तरुण-तरुणींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले होते. परंतु, या प्रकरणात मात्र मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या तरुणाला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. धर्मांतर करणाऱ्या तरुणाला धमक्या मिळत असल्याने त्याला सुरक्षा पुरवण्यात आल्याचे स्पष्टीकरण उत्तरप्रदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.
संबंधित २६ वर्षांच्या कासिम या तरुणाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. यासाठी आर्य समाजात रितीरिवाजाप्रमाणे प्रक्रियाही पार पडली. मात्र, यानंतर धमक्या मिळू लागल्यानं कासिमने पोलिस स्टेशन गाठले. मी घरवापसी केली आहे. माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदू समाजाचाच भाग होते मी आज आपल्या पूर्वजांमध्ये आलो आहे. संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. कोणत्याही दबावाशिवाय मी धर्मांतर केले’, असे यावेळी मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या कासिमने म्हटले आहे.
कासिमने २०१२ मध्ये अनिता कुमारी या महिलेसोबत प्रेमविवाह केला होता. या जोडप्याला दोन मुलंही आहेत. अनिताच्या म्हणण्यानुसार, विवाहानंतर तिने धर्मांतर केलं नव्हतं. कासिमही आपल्या धर्माचं पालन करत होता. परंतु, मुलांसमोर नमाज पठण करण्यासाठी तो बिचकत होता. त्यामुळे तो बाहेर जाऊन नमाज पठण करत होता. आता मात्र पतीनं धर्मांतर केल्यानंतर आपल्याला आनंद झाल्याचं अनितानं म्हटले आहे.