ममता बॅनर्जींसाठी पवार, केजरीवाल आणि स्टॅलिन एकत्र येण्याची शक्यता, कोलकात्यात होणार भव्य सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोलकात्यामध्ये होणाऱ्या सभेसाठी ममता बॅनर्जींनी आमंत्रित केलंय. पवारांनीही या सभेला यायला होकार कळवल्याची माहिती आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आपल्या भूमिकेला समर्थन दिल्याबद्दल ममता बॅनर्जींनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचेही आभार मानलेत.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी वातावरण तापायला सुरुवात झालीय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली असून रविवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती टीएमसीकडून जाहीर करण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोलकात्यामध्ये होणाऱ्या सभेसाठी ममता बॅनर्जींनी आमंत्रित केलंय. पवारांनीही या सभेला यायला होकार कळवल्याची माहिती आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आपल्या भूमिकेला समर्थन दिल्याबद्दल ममता बॅनर्जींनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचेही आभार मानलेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात ममता बॅनर्जींनी कोलकात्यामध्ये एका भव्य सभेचं आयोजन केलंय. सर्व भाजप विरोधकांना एकत्र करून शक्तीप्रदर्शन करण्याचाही त्यांना प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना एकत्र आणण्याचा ममता बॅनर्जींचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरू झाल्याचं चित्र आहे. केंद्र सरकार सूडभावनेनं पश्चिम बंगालच्या अंतर्गत राज्यकारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय.