केंद्राची वागणूक नकारात्मक; बीजदचा घणाघाती हल्ला

बीजद पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रणव प्रकाश दास यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा कोणताही प्रयत्न पक्ष सहन करणार नाही असा इशारा दिला.

भुवनेश्वर: ओडिशातील सत्ताधारी बीजू जनता दल (बीजद) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रणव प्रकाश दास यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा कोणताही प्रयत्न पक्ष सहन करणार नाही असा इशारा दिला. ते म्हणाले की, पक्षाच्या वतीने केंद्राच्या बेपर्वा व नकारात्मक दृष्टीकोनाविरोधात राज्यात लढा उभारला जाईल. पक्षाचे सरचिटणीस (संघटना) आणि जाजपूरचे आमदार प्रणव प्रकाश दास बीजद प्रदेश कार्यकारिणी बैठकीला संबोधित करीत होते. पटनायक यांच्यानंतर पक्षात दुसरे स्थान असलेल्या गोपालपूरचे आमदार प्रदीप पाणीग्रही यांन फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.

पाणीग्रहींना पोलिसांनी केली होती अटक
पाणीग्रही यांच्यावर लोकविरोधी कार्यात सहभागी असल्याचा आरोपही आहे. पाणीग्रही हे एकेकाळी पटनायक यांच्या अगदी जवळचे होते आणि त्यांनी बरीच वर्षे हिंजली विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते. नोकर भरती घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना बीजेदने त्यांना निलंबित केले होते. त्यानंतरच विरोधी पक्षांनी पटनायक यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची चांगली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासही दास यांनी पक्षाच्या सदस्यांना सांगितले आहे.