महिलांच्या लग्न, धर्मांतरण निर्णयात हस्तक्षेप नको- कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय

कोलकाता उच्च न्यायालयाने लग्न आणि धर्मांतराबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एखादी वयस्क महिला आपल्या पसंतीने लग्न आणि धर्मांतरणाचा निर्णय घेत असेल आणि तिच्या वडिलांकडे जात नसेल तर त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कोलकाता: सद्यस्थितीत संपूर्ण देशात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. देशात घडलेल्या लव्ह जिहादच्या घटनांमुळे विविध राज्यांनी त्याविरोधात सक्तीचे पाऊल उचलत बळजबरी धर्मांतराविरोधात कठोर कायदा केला आहे. या कायद्यांतर्गत शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. अशातच, कोलकाता उच्च न्यायालयाने लग्न आणि धर्मांतराबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एखादी वयस्क महिला आपल्या पसंतीने लग्न आणि धर्मांतरणाचा निर्णय घेत असेल आणि तिच्या वडिलांकडे जात नसेल तर त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुस्लीम तरुणाशी केला होता प्रेमविवाह
हायकोर्टाच्या न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठात एका वडिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यांची मुलगी सप्टेंबर २०२० पासून बेपत्ता असून तिने लग्नानंतर धर्मांतर केले आहे. ७ डिसेंबर २०२० रोजी बंगालच्या मुरूतिया पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. माझी मुलगी १९ वर्षांची असून तिने पळून जात असमूल शेख नामक मुलाशी लग्न केले, असे वडिलांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

स्वमर्जीने घेतला निर्णय
सुनावणीदरम्यान न्यायालयात त्यांची मुलगी पल्लवी सरकार हिचे निवेदनही कोर्टात दाखविण्यता आले. १६ सप्टेंबर २०२० रोजी, असमूल सोबत आपले संबंध होते आणि मी स्वमर्जीने त्याच्यासोबत राहत आहे, असा जबाब पल्लवीने दिला होता. पल्लवीच्या वडिलांनी हायकोर्टात सांगितले की, ज्या दिवशी मुलीचा जबाब नोंदविण्यात आला, त्या दिवशी मला मुलीला भेटू दिले नाही. त्यांच्या मुलीने आपले नाव बदलले असून आता ती आयशा खातून नावाने ओळखली जाते.

दाम्पत्य नोंदविणार जबाब
यावर उच्च न्यायालयाने मुलगा आणि मुलीला २३ डिसेंबर रोजी जबाब नोंदविण्याचे आदेश दिले. यामुळे, मुलीने दबावात जबाब नोंदविला होता की, लग्नाला तिची सम्मती होती, हे उघडकीस येईल. त्यांचा जबाब नोंदविताना कोर्टात संबंधितांशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.