मध्यप्रदेशातून हलणारही नाही; राजकारण संन्यासाचे वृत्त कमलनाथांनी फेटाळले

मध्यप्रदेशातून हलणार तर नाहीच शिवाय राजकारणातून संन्यासही घेणार नाही, पक्ष नेतृत्व जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकतेने पार पाडेन -कमलनाथ

भोपाळ: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ दिल्लीहून राज्यात परतताच सक्रिया राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. या सर्व चर्चांना त्यांनी दिल्लीहून परतताच पूर्णविराम दिला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत २७ पैकी केवळ ९ जागाच काँग्रेसला प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासूनच भाजपाने कमलनाथांवर टीकास्त्र सोडले व त्यांना दिल्लीच्या राजकारणात परत जाण्याचे सल्लेही दिले. भाजपा नेत्यांच्या या सल्ल्यांचा कमलनाथ यांनी दिल्लीहून परतताच खरपूस समाचार घेतला. मध्यप्रदेशातून हलणार तर नाहीच शिवाय राजकारणातून संन्यासही घेणार नसल्याचे त्यांनी ठणकावले. पक्ष नेतृत्व जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकतेने पार पाडेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदेवर केले गंभीर आरोप
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी कमलनाथ यांनी भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे यांना भाजपात कितपत समाधानी ठेवेल यावरच त्यांचे भविष्य टिकून आहे असे कमलनाथ म्हणाले. शिंदे यांना सोयीचे राजकारण हवे. मी जे म्हणेल ते मला मिळायलाच हवे असेच त्यांचे मत असते. जर भाजपाने त्यांना हवे ते दिले नाही तर मात्र दोघांचेही (शिंदे व भाजपा) भविष्य नाहीच असा दावाही कमलनाथ यांनी केला.

स्वत:च केली होती निवृत्तीची घोषणा
उल्लेखनीय असे की छिंदवाडा येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना कमलनाथ यांनी स्वत:च राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. तथापि त्यानंतर त्यांनी घुमजाव केले होते. त्यावेळी ही वेळ संघर्षाची असून सर्वांनाच संघर्ष करावा लागेल. जर तुम्ही विश्रांत घेणार असाल तर मी सुद्धा विश्रांती घेण्यास तयार आहे. प्रश्न जर दिल्लीला जाण्याचा असेल तर मात्र मध्यप्रदेशातून हलणारही नाही असे म्हणाले.