ओमायक्रॉनचा धोका वाढला; दिल्लीत Yellow Alert, थिएटर्स, शाळा-कॉलेजांची पुन्हा टाळेबंदी; मुख्यमंत्र्यांनी लागू केले निर्बंध

ओमायक्रॉनच्या (Omicron) बाधितांची एकूण संख्या ५७८ वर पोहोचली असून, त्यातील १५१ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली. या विषाणूचा प्रसार १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत यलो अलर्ट (Yellow Alert In Delhi) जारी करण्यात आला आहे.

  नवी दिल्ली: २०२२ च्या सुरूवात होत असताना वर्ष २०२१ हे गेले वर्ष संपूर्ण कोरोनाच्या छायेत गेले. पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा (Corona Virus) नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) संसर्गाचे सावट असून तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यताही वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले असून प्रशासनाने कंबर कसली आहे. देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. या विषाणूचे एकाच दिवसात इतक्या प्रमाणात नवे रुग्ण सापडण्याची घटना भारतात पहिल्यांदाच घडली आहे.

  ओमायक्रॉनच्या (Omicron) बाधितांची एकूण संख्या ५७८ वर पोहोचली असून, त्यातील १५१ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली. या विषाणूचा प्रसार १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत यलो अलर्ट (Yellow Alert In Delhi) जारी करण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिल्लीत झपाट्याने वाढत असल्याने केजरीवाल सरकारने (Kejriwal Government) हे पाऊल उचलले आहे.

  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे ‘दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स ॲक्शन प्लान’नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दिल्लीत काही गोष्टींवर बंदी घातली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात जाण्याची गरज नसली, ऑक्सिजन नाही, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज नाही, तर ओमायक्रॉन संक्रमित लोक घरीच बरे होत आहेत, असं केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

  नेमके निर्बंध काय, जाणून घ्या सविस्तर

  १. शाळा, महिवाद्यालय बंद राहणार.
  २. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
  ३. थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील.
  ४. दुकाने आणि वस्तू सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील.
  ५. आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त ५०% दुकानदारांना परवानगी असेल.
  ६. मेट्रो आणि बसेस ५०% क्षमतेने धावतील.
  ७. रेस्टॉरंट्स ५०% क्षमतेसह सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडतील.
  ७. ५०% क्षमतेसह बार दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडतील.
  ८. सलून उघडता येतील.
  ९. लग्न समारंभात फक्त २० लोकांनाच परवानगी असेल.
  १०. धार्मिक स्थळे खुली राहतील मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे.
  ११. सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा उपक्रमांवर बंदी.

  दरम्यान, जगातील इतर देशांबरोबरच भारतामध्येही ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील १९ राज्यांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. तसेच जगभरात तब्बल ११६ देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

  गर्दी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या फैलावाला निमंत्रण देणारी

  सणांदरम्यान, गर्दी रोखण्यासाठी निर्बंध घालण्याबाबतही राज्यांनी विचार करावा, असा सल्लाही गृहमंत्रालयाने दिला आहे. आधी नाताळ व नववर्ष, त्यानंतर संक्रांत आणि होळी असे सण येत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार, मॉल्समधील गर्दीची अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यामुळे चिंता वाढत आहे. अशा ठिकाणची गर्दी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या फैलावाला निमंत्रण देणारी ठरू शकते.

  ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत तीन पट अधिक

  ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत तीन पट अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे नव्हे आव्हान उभे झाले आहे. या पत्रामधून गृहमंत्रालयाने सामान्य नागरिकांनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जे नियम बनवले जातील त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम ५० ते ६१ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिनियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही या पत्रामधून देण्यात आला आहे.