राष्ट्रपती पत्नी सवितादेवींसह एका विशेष रेल्वेगाडीने कानपूर येथे आले. त्यानंतर त्यांनी आपल्या गावाला भेट दिली. गावात दाखल होताच त्यांनी पत्नीसह पथरी देवी मंदिरात दर्शन घेतले आणि 15 मिनिटे विधिवत पूजा केली. राष्ट्रपती आपल्या गावी गेले तेव्हा त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हेही होते. त्यांनी राष्ट्रपतींचे स्वागतही केले. आपल्या आयुष्यात आपल्या गावाचे स्थान काय आहे हे सांगताना राष्ट्रपती भावुक झाले होते.
कानपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जमिनीवर पाय ठेवताच, तेथील माती कपाळावर लावली… आणि भूमीला अभिवादन केले. दोन मिनिटे ते त्या मातीकडेच बघत राहिले. नंतर त्यांनी समोरच्या सर्व मंडळींकडे पाहिले… आकाशापासून जमिनीपर्यंत त्यांनी डोळ्यात साठवले… आणि म्हणाले, “माझ्या जन्मगावाला माझे आयुष्य समर्पित आहे…” हा प्रसंग आहे परौंख या त्यांच्या जन्मगावचा. कानपूरपासून जवळच हे गाव आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर तब्बल चार वर्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रथमच आपल्या जन्मगावी परौंख येथे पोहोचताच उजाळा दिला.
राष्ट्रपती पत्नी सवितादेवींसह एका विशेष रेल्वेगाडीने कानपूर येथे आले. त्यानंतर त्यांनी आपल्या गावाला भेट दिली. गावात दाखल होताच त्यांनी पत्नीसह पथरी देवी मंदिरात दर्शन घेतले आणि 15 मिनिटे विधिवत पूजा केली. राष्ट्रपती आपल्या गावी गेले तेव्हा त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हेही होते. त्यांनी राष्ट्रपतींचे स्वागतही केले. आपल्या आयुष्यात आपल्या गावाचे स्थान काय आहे हे सांगताना राष्ट्रपती भावुक झाले होते.
मातीचा सुगंध आणि आठवणी कायम
मी जिथे कुठे जाईन तिथे माझ्यासोबत माझ्या गावच्या मातीचा सुगंध आणि गावकऱ्यांच्या आठवणी कायम असतील. माझ्यासाठी परौंख फक्त एक गाव नाही तर माझी मातृभूमी आहे. तिच्याकडून मला कायम पुढे जात राहण्याची आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट, त्यानंत राज्यसभा ते राजभवन व आता राष्ट्रपती भवन, कुठेही असो, गावाची आठवण ताजीच असते असे राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपतीपदाचा विचारच केला नव्हता
कानपूरमध्ये आयोजित अभिनंदन सोहळ्याला संबोधित करताना राष्ट्रपती भावुक झाले होते. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्यासारखा गावातला एक सामान्य मुलगा संपूर्ण देशाची जबाबदारी घेईल. त्याला देशातलं सर्वोच्च स्थान मिळेल. पण आपल्या लोकशाहीने हे करुन दाखवले, असे ते म्हणाले.
रम्य बालपण… दोस्ताना
बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना गावात आता चांगली आणि पक्की घरे झाली असल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी त्यांनी बालपणीच्या मित्रांचीही आठवण केली. जसवंत, विजयपाल, हरिराम, चंद्रभान यांच्यासोबत शिक्षणास प्रारंभ केला होता, असेही ते म्हणाले. राजकीय जीवनात पदार्पण करण्याचे श्रेय बजरंग सिंह यांना असून राममनोहर लोहिया यांना गावात आणण्याचे श्रेय त्यांनाच आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. यासोबतच जगदीशसिंह, कैलाश बाजपेयी, मोती शुक्ला, भोले सिंह यांनी गावाची एकजूट कायम ठेवली असाही उल्लेख केला. गावात 15 वर्षे व्यतीत केले असे सांगत त्यावेळी कनिष्ठ महाविद्यालय असते तर बऱ्याच जणांना संधी मिळाली असती, असेही ते आवर्जून म्हणाले.
कुतूहल साऱ्यांनाच असते.
यापूर्वीचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे त्यांच्या जन्मगावी दोनदा गेले. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी जळगाव आणि अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या कौटूंबीक वारसा असलेल्या गावांना भेटी दिल्या होत्या.