कामाची बातमी : नवीन वर्षात ATM मधून पैसे काढणं आणि कपडे- फुटवेअर खरेदी करणं महागणार, १जानेवारीपासून होणार ‘हे’ ६ बदल

नवीन वर्ष म्हणजे २०२२ (New Year 2022) आपल्यासोबत अनेक बदल (Rules Changes) घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. १ जानेवारीपासून एटीएम (ATM) मधून पैसे काढणे आणि कपडे आणि फुटवेअर (Cloths And Footwear) खरेदी करणे महाग होणार आहे. आम्ही तुम्हाला १ जानेवारी (1st January 2022) पासून होणार्‍या ६ बदलांबद्दल सांगत आहोत.

  १. ATM मधून पैसे काढणे महागणार

  RBI ने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

  २. कपडे आणि फुटवेअर खरेदी करणे महाग होईल

  १ जानेवारीपासून कपडे आणि फुटवेअरवर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील GST ७% ने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर ५% जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या ॲप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे.

  ३. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले लसीसाठी नोंदणी करू शकतील

  देशात 3 जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन ॲपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी १० वी च्या वर्गाचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.

  ४. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने वाढवलेले शुल्क

  इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना १ जानेवारीपासून रोख रक्कम काढणे आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवींसाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५०% शुल्क भरावे लागेल जे किमान रु.२५ असेल. तथापि, मूलभूत बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

  मूलभूत बचत खात्याव्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यात १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजार नंतर ०.५०% शुल्क आकारले जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा रु २५,००० पर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.५०% शुल्क आकारले जाईल.

  ५. ॲमेझॉन प्राइमवर थेट क्रिकेट सामने बघता येतील

  Amazon च्या OTT प्लॅटफॉर्मवर आता प्राइम व्हिडिओवर लाइव्ह क्रिकेट सामने पाहता येणार आहेत. Amazon प्राइम व्हिडिओ पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह थेट क्रिकेट प्रवाहात प्रवेश करत आहे.

  ६. कार खरेदी करणे महाग होईल

  नवीन वर्षात, मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स १ जानेवारी २०२२ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५% ने वाढवणार आहे.