पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रश्नात शरद पवारांनी घातलं लक्ष, सर्वपक्षीयांना एकवटण्याचा प्रयत्न

राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत केंद्र सरकार करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या, ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याची भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलीय. या प्रकरणात स्वतः शरद पवार लक्ष घालत असून गरज पडल्यास ते पश्चिम बंगाललाही जातील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

पश्चिम बंगालमधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करून केंद्र सरकार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालायला पवारांनी सुरुवात केल्याचे संकेत मिळतायत.

राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत केंद्र सरकार करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या, ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याची भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलीय. या प्रकरणात स्वतः शरद पवार लक्ष घालत असून गरज पडल्यास ते पश्चिम बंगाललाही जातील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत असून याबाबत शरद पवार देशातील इतर पक्षांच्या नेत्यांशीदेखील चर्चा करत असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिलीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिलीय. पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा हा विषय उचलून धरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं नवाब मलिक यांच्या विधानांमधून सध्या जाणवत आहे.

यानिमित्तानं पवारांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीयांना भाजपच्या विरोधात एकवटण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या निवडणुकांचा माहोल तयार व्हायला आतापासूनच सुरुवात झालीय. जानेवारी महिन्यात कोलकात्यात एका भव्य सभेचं आयोजन ममता बॅनर्जींनी केलं असून त्या सभेला शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि एम. के. स्टॅलिन यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा ममता बॅनर्जींचा प्रयत्न आहे.