Shop in Udaipur open 24 hours a day

आपण प्रत्येक जण काही ना काही खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. दुकानात दुकानदारच नसेल तर आपल्याला पाहिजे ती वस्तू घेता येणार नाही, हे नक्की. तरीही आपण वस्तू घेण्याचा प्रयत्न केला, तर दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत आपली चोर म्हणून नोंद होईल. म्हणून आपल्याजवळ दुकानदाराची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र, गुजरातमधल्या छोटा उदयपूर जिल्ह्यातल्या केवडी गावात एक असे अनोखे दुकान आहे, ज्यात दुकानदार नसला तरी ग्राहकांना खरेदी करता येते. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून हे दुकान एकदाही बंद करण्यात आलेले नाही. सईदभाई नावाच्या व्यक्तीचे हे दुकान आहे(Shop in Udaipur open 24 hours a day).

    उदयपुर : आपण प्रत्येक जण काही ना काही खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. दुकानात दुकानदारच नसेल तर आपल्याला पाहिजे ती वस्तू घेता येणार नाही, हे नक्की. तरीही आपण वस्तू घेण्याचा प्रयत्न केला, तर दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत आपली चोर म्हणून नोंद होईल. म्हणून आपल्याजवळ दुकानदाराची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र, गुजरातमधल्या छोटा उदयपूर जिल्ह्यातल्या केवडी गावात एक असे अनोखे दुकान आहे, ज्यात दुकानदार नसला तरी ग्राहकांना खरेदी करता येते. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून हे दुकान एकदाही बंद करण्यात आलेले नाही. सईदभाई नावाच्या व्यक्तीचे हे दुकान आहे(Shop in Udaipur open 24 hours a day).

    सईदभाई यांनी वयाच्या अठराव्या वर्षी हे दुकान सुरू केले आहे. त्यांचे वडील एक व्यापारी होते. गावात त्यांना ‘उभा सेठ’ या नावाने ओळखले जात असे. आता त्याच नावाने लोक सईदभाईंना हाक मारतात. त्यांच्या दुकानाचे नावदेखील ‘उभा सेठ की दुकान’ असेच आहे. ते कधीही आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाकडे पैसे मागत नाहीत.

    सईदभाई दुकानात असोत किंवा नसोत, ग्राहक येऊन आपल्याला पाहिजे ती वस्तू घेतो आणि काउंटरवर पैसे ठेवून जातो. विशेष म्हणजे हे अनोखे दुकान वर्षाचे 365 दिवस अहोरात्र उघडेच असते. दुकानाचे मालक असलेले सईदभाई म्हणतात, की त्यांचा गावातल्या नागरिकांवर विश्वास आहे. ते त्यांना कधीही धोका देणार नाहीत. त्यामुळे ते 24 तास दुकान सताड उघडे ठेवतात.

    सईदभाईंच्या दुकानाला एकही दरवाजा नाही. तरीदेखील या ठिकाणावरून अद्याप काहीही चोरीला गेलेले नाही. चार वर्षांपूर्वी दुकानातून पहिल्यांदा एक बॅटरी उचलून नेण्यात आली होती. ही गोष्ट गावकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले होते; पण दुकानमालकाने तक्रार केली नाही. ‘चोराने पैसे चोरले नाहीत याचा मला आनंद झाला. कदाचित त्याला बॅटरीची गरज असेल, म्हणून त्याने फक्त बॅटरी घेतली,’ अशी प्रतिक्रिया सईदभाईंनी दिली होती.

    सईदभाईंचं दुकान केवडी गावात असले, तरी ते त्या ठिकाणी राहत नाहीत. सुरुवातीला ते एकटे गावामध्ये राहत होते; मात्र वयाच्या 27व्या वर्षी लग्न केल्यानंतर त्यांनी जवळपास 13 वर्षं गोध्रातून अपडाउन केले. आता गेल्या 17 वर्षांपासून ते बडोद्यात वास्तव्याला आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यातला एक पायलट आहे, तर दुसरा आपले शिक्षण पूर्ण करत आहे.